पाण्यावर 2 तास योगासने; इंडिया बुकमध्ये चौघांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पंधरा हजार विक्रमांची नोंद 
विश्‍वदीप रॉयचौधरी म्हणाले, 'देशातील विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दहा वर्षांपूर्वी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌' ची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत पंधरा हजार विक्रमांची नोंद यात करण्यात आली आहे. त्यात सांगलीतील चौघांनी नव्याने नोंद होईल. या विक्रमांची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाते.'' 

सांगली : पाण्यात दोन तास राहून 70 प्रकारच्या योगासनांचे प्रकार 'त्याने' दाखवले... पाठीमागे टाळी वाजवून डिप्स्‌ मारणारा बहाद्दरही तेथे होता. पाठीवर वजन घेऊन डिप्स मारणारे दोन जिद्दींनीही कमाल दाखवली... साऱ्या सांगलीत आज एकच चर्चा होती. चौघांनी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌' केला. एकाच दिवशी आणि तेही एकाच शहराच चार नवे रेकॉर्ड नोंदवत सांगलीचा बहुमान देशपातळीवर उंचवला गेला. 

क्रीडा भारती आणि श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट (तासगाव) यांच्या संयुक्त वतीने कार्यक्रम घेण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे निरीक्षक विश्‍वदीप रॉयचौधरी यांनी खेळाडूंचे परीक्षण करीत त्यांची रेकॉर्डला नोंद केली. पद्माळे (ता. मिरज) येथील जलतरणपटू नीलेश जगदाळे याने रोटरी क्‍लबच्या रामभाऊ भिडे जलतरण तलावात सकाळी 11 वाजता रेकॉर्डला सुरवात केली. तब्बल दोन तास पाण्यावर तरंगत योगासने केली. त्यात सत्तर प्रकारांच्या आसनांचा समावेश होता. पुरुष गटात असा विक्रम नोंदवणारा भारतातील पहिलाच म्हणून त्याची नोंद झाली. 

त्यानंतर दुपारी तीन वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात उर्वरित तिघांची चाचणी घेण्यात आली. त्यात सांगलीतील आकाश जुगळे या खेळाडूने पाठीमागे टाळी वाजवून जर्क मारून डिप्स मारण्याचा नवा विक्रम नोंदवला. एका मिनिटात तीस वेळा करण्याचे उद्दिष्ट होते. आकाशने 36 वेळा तो प्रकार करत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. हरी महाबळ आणि वैभव माईणकर या खेळाडूंनी पाठीवर वजन घेऊन डिप्स मारण्याच्या प्रकार देशपतळीवर आपली नोंद केली. 

हरी महाबळ याने 45 किलो वजन पाठीवर घेऊन एक मिनिटात 39 डिप्स्‌, तर वैभवने 27 किलो वजन पाठीवर घेऊन 46 डिस्प मारले. सांगलीच्या चौघांनी एकाच वेळी आपली नोंद केली. दरम्यान, तासगावचे रामचंद्र काळे यांनी रिव्हर्स गिअर नसलेली दुचाकी रिव्हर्समध्ये चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. रेकॉर्ड बनवण्यासाठी त्यांनी योग्य त्या सूचना श्री. रॉयचौधरी यांनी दिल्या. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, क्रीडा भारतीचे दीपक लेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी श्री. कोटणीस, नाना सिंहासने, रामकृष्ण चितळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
 

Web Title: yoga on water; four records in india book of records

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी