साहेब बोलतात पण नेहमी खरंच..!

अशोक मुरूमकर
Sunday, 24 November 2019

- हे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत का? 
- राजकीय घडामोडींवर व्हिडिओ होताहेत व्हायरल 
- व्हिडीओंचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

सोलापूर : 2019ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घडामोडींमुळे गाजत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून कुठल्या क्षणाला काय बातमी समजेल, याचा अंदाज कोणालाच येत नाही. प्रत्येक घटना "आता पुढे काय..?' याची उत्सुकता लावणारी ठरत असल्याचे चित्र सध्या आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या या राजकीय घडामोडी धक्कादायक मानल्या जात असल्या, तरी नेटिझन्स मात्र यातून वेगवेगळे जोक्‍स आणि व्हिडिओ क्‍लिपच्या माध्यमातून आनंद घेत आहेत.

प्रत्येक घडामोडीला शोभतील असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे. सध्या संजय राऊत यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ असाच चर्चेत आला आहे. याबरोबरच राज ठाकरे यांनी केलेल्या राजकीय वक्‍तव्यांचे व्हिडिओ चर्चेत आले आहेत. 

हेही वाचा : सोलापूर जिल्हा दोन्ही देशमुखांचीच सद्दी? 
डान्स करताना... 

शनिवारी सकाळी भाजपने अजित पवार यांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यामुळे सोशल मीडियावर काहींनी आश्‍चर्य व्यक्त केले. काहींना यामुळे धक्का बसला, काहींनी आनंद व्यक्त केला तर यावर काहींनी संतापही व्यक्त केला. दरम्यान, "फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करताना संजय राऊत' अशी ओळ टाकून एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. यात डान्स करणारी व्यक्ती राऊत यांच्यासारखी दिसणारी असल्याचे मानले जात आहे. 

हेही वाचा : फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी 
शरद पवार आता तुमची बारी...
 
गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाची एक क्‍लिप फिरत असून, अजित पवार भाजपबरोबर गेल्यामुळे "शरद पवार आता तुमची बारी आली आहे' असं त्यात मुंडे म्हणत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेची आठवण व्हिडिओच्या माध्यमातून करून दिली जात आहे. "मी पुन्हा येईन' या फडणवीसांच्या वक्‍तव्याची क्‍लिपदेखील चर्चेत आली आहे. 

पान टपरीवाला तरी विचारेल का? 
निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याची क्‍लिप सध्या व्हायरल होत आहे. पवार यांनी शनिवारी विश्‍वास बसणार नाही अशा प्रकारे भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर दिवसभर झालेल्या घडामोडी आणि अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे अजित पवार हे आता एकाकी पडलेत की काय, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : भाजपला मी व्यापारी समजत होतो पण.., आमच्याकडे 165 आमदार : संजय राऊत 
नाही नाही नाही नाही..

राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करणार का, असा प्रश्‍न एका वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यामध्ये "राष्ट्रवादीशी कधीही जाणार नाही नाही नाही नाही' असं वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. मात्र, काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याच मदतीने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 22 सेकंदांचा व्हिडिओ यानिमित्ताने चर्चेत आला आहे. 


पत्त्यांचा क्‍लब... 
निवडणुकीत शिवसेना व भाजप एकत्र लढणार व निवडणुका झाल्या की राष्ट्रवादी व शिवसेना हातमिळवणी करणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार, असे भाकीत राज ठाकरे यांनी एका सभेदरम्यान केले होते. अगदी तशीच परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. त्यांच्या या भाषणाचा 30 सेकंदांचा व्हिडिओदेखील चर्चेत आला आहे. त्यांना "हा पत्त्यांचा क्‍लब का'? असा प्रश्‍न यामध्ये केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You have seen these videos