चहावाला ते डान्सर : सोलापूरातील तरुणाचा प्रवास ऐकुन तुम्ही ही व्हाल थक्क! 

चहावाला ते डान्सर : सोलापूरातील तरुणाचा प्रवास ऐकुन तुम्ही ही व्हाल थक्क! 

सोलापूर : वयाच्या पहिल्याच वर्षी आईचे निधन झाले. पुढे घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून सोलापूर रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून उर्वरित शिक्षण पूर्ण करत रामवाडीत राहणाऱ्या अनिल राठोड याने आज सोलापुरात डान्सर म्हणून वेगळा ठसा उमटविला आहे. 

अनिल राठोड एक वर्षाचा असताना आईचे निधन झाले. वडील व्यसनी असल्याने आजी- आजोबांनी अनिल आणि त्याच्या बहिणीला सांभाळण्यासाठी गावी नेले. मात्र, त्या ठिकाणाहून वडिलांनी आपली मुले आपल्याजवळच पाहिजेत म्हणून पुन्हा आपल्या घरी आणली. दरम्यान, या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र, घरच्या हालखीच्या परिस्थितीमुळे शाळेत जाण्यासाठी पैसे नसायचे. कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास अनिलला लागला होता. अनिलची घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती की त्याला सिमेंट पोत्याचा वापर बॅग म्हणून करावा लागत असे. तसेच मित्रांचे फाटलेले कपडे तो अर्लटर करून वापर असे. असे असले तरी अनिल विटी दांडू, गोट्या, भोवरा या खेळात नेहमीच पुढे असायचा. 

हात मोडला तरीही... 
एकदा विटी दांडू खेळताना विटी पकडताना तो पाय घसरून पडला आणि हात मोडला. त्या वेळी त्यांच्या बहिणीने आणि साथ दिली. त्यानंतर त्याने पोटासाठी शिक्षण सोडले आणि सोलापुरातील एका हॉटेलात टेबल पुसायला सुरवात केली. त्या वेळी त्याला दिवसाला 30 रुपये पगार मिळत असे. अनिलने वयाच्या 14 व्या वर्षी चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी अनिलने कन्नड, हिंदी, मल्याळम, पारशी भाषेचे ज्ञान घेतले. त्यानंतर तो रेल्वे स्टेशनवरच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या साफसफाईचे काम करू लागला. तसेच चहाचा पण त्याचा व्यवसाय जोरात होता. त्याने कामासाठी दोन मुले ठेवली. हे काम आणि व्यवसाय सुरळीत चालू असताना त्याला अचानक मणक्‍याचा त्रास उद्‌भवला. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर तो विश्रांतीसाठी बहिणीकडे मुंबईला गेला. तो दिवाळीचा काळ असल्याने त्याने तीन महिने आकाशकंदील बनविण्याचे काम केले. त्यानंतर सोलापुरात पुन्हा आल्यावर उर्वरित दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मानलेल्या भावाने स्वत: दिव्यांग असून पदरचे पैसे खर्च करून अनिलला आश्रमशाळेत प्रवेश मिळवून दिला. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर परत रेल्वे स्टेशनवर चहाचा व्यवसाय करायचा नाही, असे त्याने ठरवले. 

असे घेतले प्रशिक्षण 
घराशेजारी असणाऱ्या धनराज होनसुरे याने अनिलला डान्स शिकवला आणि डान्स शिकविण्याचे प्रशिक्षणही दिले. अनिलने 2010 मध्ये रामवाडीतील चार लहान मुलांना सोबत घेऊन ग्रोथ डान्स ऍकॅडमीची स्थापना केली. डान्स शिकवायला जागा नव्हती. विद्यार्थ्यांच्याच घराच्या गच्चीवर काही दिवस चार विद्यार्थ्यांना डान्सचे प्रशिक्षण दिले. एका डान्स स्पर्धेत ग्रोथ डान्स ऍकॅडमीच्या एका विद्यार्थ्याने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले. हे पाहून अजून चार मुले ग्रोथ डान्स ऍकॅडमीत सामील झाली. त्यानंतर एक हॉल भाड्याने घेतला आणि मुलांना डान्सचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. आजच्या घडीला 100 पेक्षा जास्त मुले अनिलकडे डान्सचे प्रशिक्षण घेत आहेत. तर प्रशिक्षण देण्यासाठी 15 विद्यार्थी त्याने तयार केले आहेत. शहरात आज दोन ठिकाणी त्याची ऍकॅडमी सुरू आहे. शहरातील विविध 14 ते 15 शाळांत तो डान्स शिकविण्यासाठी जातो. आज त्याचे चार ते पाच लाख वार्षिक उत्पन्न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com