चक्क... बत्तीस सेकंदांत फेटा बांधणारा कोल्हापुरी तरुण

The young Kolhapuri made the feta in thirty-two seconds
The young Kolhapuri made the feta in thirty-two seconds

कोल्हापूर - फेटा बांधणं साधं सोपं नाही. भल्याभल्यांना दुसऱ्याकडून फेटा बांधून सण-समारंभात मिरवावं लागतं. डोक्‍यावरील भगव्या कापडाला पीळ देऊन तुरा काढावा लागतो. ग्रामीण भागात फेटे बांधणाऱ्यांना जुन्या पिढीचा तोटा नाही. ‘नव्या पिढीला फेटा बांधणं जमणं जरा अवघडंच..’ या वाक्‍याला कसबा बावड्यातल्या रायडर ऊर्फ चेतन सर्जेराव बिरंजे याने छेद दिला आहे. बत्तीस सेकंदांत फेटा बांधण्यात त्यानं कसब हाशील केलेय. डोळे बांधून पट्ट्याने टाचेखालील लिंबू कापण्यातलं त्याचं धाडस मोठे आहे. शेतीकामात घाम गाळत त्याचा मर्दानी खेळात हात सफाईदारपणे चालतो. 

फेटा बांधण्यातलं गणित पाच मिनिटांवरून बत्तीस सेकंदांवर 

चेतनच्या स्वभावात आक्रमकता ठासली आहे. सडेतोड, बिनधास्त, रोखठोक अशी विशेषणे त्याच्या नावापुढे मित्रांनी चिकटवली आहेत. छत्रपती राजाराम हायस्कूलमधील दहा वर्गांच्या खोल्यात चेतन फारसा रमला नाही. डोक्‍यात पुस्तकातले काही घुसणार नाही, हा त्याचा निव्वळ भ्रम विलंबाने दूर झाला. त्याच्या उपजत गुणांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या कसबा बावड्यातल्या आखाड्यात बहर फुटला. फेटा बांधण्याची गड्याला भारी हौस. आत्याच्या मुलाकडून तो फेटा बांधण्यास शिकला. भगव्या कापडाची दोन टोकं धरून डोक्‍याभोवती त्याचा फेर धरणं कठीण काम. चेतनचा कापडाला पीळ देताना हात चुकायचा. अल्पावधीतच त्याच्या हातानं वेग पकडला. फेटा बांधण्यातलं गणित पाच मिनिटांवरून त्यानं बत्तीस सेकंदांवर आणलं. गावोगावच्या कार्यक्रमात फेटा बांधण्याच्या सुपाऱ्या त्याला येतात. एका फेट्यामागं तो दहा ते पंधरा रुपयांवर समाधान मानतो. अडीच वर्षांतच त्याच्या नावापुढं फेटेवाला असं विशेषण जोडलं गेलं आहे. 

मर्दानी खेळात ही तो पारंगत

सह्याद्री प्रतिष्ठानच्या कसबा बावड्यातल्या आखाड्यात त्याने २००४ ला पाऊलं ठेवले. लाठी फिरविताना मिळालेल्या प्रसादानं गुडघा सुजला. ही सूजच त्याला आकार देणारी ठरली. भिंगरीसारखी लाठी त्याच्या हातात फिरू लागली. शेतीकामात व्यस्त वडील सर्जेराव व आई जयश्री त्याच्या मर्दानी खेळातल्या कौशल्यावर फिदा राहिली. दोघांचा त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात राहिला. प्रशिक्षक प्रदीप थोरवत यांच्या कडक शिस्तीत त्याला गडभ्रमंतीचं वेड लागलं.

शिवराज्याभिषेक सोहळ्यात फेटा बांधण्यात तो सर्वात पुढे

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यात फेटा बांधण्यात तो आजही पुढे असतो. पन्नास जणांना हातासरशी फेटे बांधून नटवतो. होळीच्या माळावर डोळे बांधून पट्ट्याने लिंबू काढणी करतो. पट्ट्याच्या वारात लिंबूचे दोन काप तो करतोच, शिवाय टाळ्यांच्या कडकडाटाचं बक्षीस हमखास मिळवतो. 
लिंबू काढणीत चार लिंबूंमध्ये एक लिंबू ठेवून तो कापणं सहसा कोणाला जमत नाही. चेतन मधल्या लिंबूचे दोन भाग करतो. कुत्र्यांचा शौक त्याला नवीन नाही. कुत्र्यांच्या स्पर्धेत गाडीची लिव्हर वाढवण्यातलं लिमिट त्याच्याकडे नाही. ‘रायडर’ म्हणूनही त्याची ख्याती आहे. भल्या पहाटे म्हशींना वैरणीचा भार आणण्याचं काम त्यानं केलं आहे. म्हशी पाळणे बंद झालं असलं तरी पाच गायींच्या सेवेचं व्रत तोच पेलतोय. फेटा बांधणी, मर्दानी खेळ व रायडरच्या त्रिसूत्रीतलं त्याचं आयुष्य वेगळं आहे. स्वभावातली आक्रमकता मात्र मर्दानी खेळातील प्रात्यक्षिकांत उफाळून येते. त्याला रोखताना प्रतिस्पर्ध्यांची दमछाक होते.          

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com