श्रीगोंद्याच्या राजकारणात तरूण तुर्क 

 Young in Shrigonda politics
Young in Shrigonda politics

श्रीगोंदे : नागवडे व कुकडी सहकारी साखर कारखान्यांसोबतच जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीचे एकत्रित राजकारण तालुक्‍यात तापले आहे. पैसे व बुद्धिभेदाच्या जिवावर सहकारातील राजकारण कसे करायचे, याचे प्रात्यक्षिकच सध्या श्रीगोंद्यात सुरू आहे. अनेक कार्यकर्ते नेत्यांच्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्यासाठी सज्ज असले, तरी अपात्र सभासद आणि थकबाकीदार संचालक यांच्याभोवती राजकारण फिरविले जात आहे. 

ठरावाची मुदत आली जवळ 
नागवडे व कुकडी सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या मतदारयाद्या प्रसिद्ध होत असून, जिल्हा सहकारी बॅंकेचे मतदार प्रतिनिधी ठराव घेण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. या सगळ्या घडामोडींत नव्यांच्या हाती निवडणूकसूत्रे आली आहेत. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व "कुकडी'चे अध्यक्ष राहुल जगताप यांना त्यांच्या वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. 

जगतापांसाठी महत्त्वाची निवडणूक 
घनश्‍याम शेलार सोबत असल्याने जगताप यांना "कुकडी'त अडचण येणार नसली, तरी जिल्हा बॅंकेसाठी नागवडे व पाचपुते यांची एकी झाल्याने आव्हान वाढले आहे. नागवडे यांच्या जवळचे लोक विरोधकांच्या यादीत गेल्याने त्यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची झाली आहे. अर्थात, या निवडणुकांची ही प्राथमिक रणनीती असली, तरी या दोन नेत्यांचा कस लागला आहे. 

सभासद अपात्रची भीती 
नागवडे कारखान्याचे निम्म्यापेक्षा जास्त सभासद अपात्र ठरविले जाण्याची भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक रंगविली जात आहे. यापूर्वी नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत, अपवाद वगळता नागवडे यांनी बाजी मारली असली, तरी मतांचा फरक जास्त राहत नव्हता. अर्थात, आता राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत पाचपुते यांना मदत केलेली असल्याने, कारखाना निवडणुकीत ही सावड पाचपुते फेडणार असल्याने नागवडे यांच्यापुढील अडचणी कमी आहेत. 

जिल्हा बॅंकेसाठी जर.. तर.. 
जिल्हा बॅंकेसाठी राहुल जगताप व विद्यमान संचालक दत्तात्रेय पानसरे ही दोन नावे चर्चेत आहेत. विधानसभेला थांबून पाचपुते यांच्याविषयीचा कमी केलेला विरोध आणि राज्यातील "राष्ट्रवादी'च्या नेत्यांचे पाठबळ, यामुळे जगताप यांना दिलासा आहे. त्याच वेळी नागवडे व पाचपुते यांची एकत्र ताकद जर पानसरे यांच्या पाठीशी राहिली, तर लढत कडवी होईल. मात्र, सध्या ठरावांमध्ये सुरू असणारे राजकारण व अर्थकारण गाजत आहे. 

बापू-तात्यांची जोडी दिसणार नाही! 
शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप ही सहकारातील तगडी जोडी या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांत दिसणार नाही. या दोन नेत्यांनी अनुभवाच्या जिवावर दाखविलेली प्रगल्भता त्यांच्या मुलांना दाखविता येते का, हे निवडणुकीत समोर येईल. त्यातच ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते हेही या निवडणुकांतून बाजूला असल्याचे जाणवत असल्याने, तरुणांच्या हाती निवडणूक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com