esakal | सांगलीत तरुणाचा खून; दहा जणांना अटक

बोलून बातमी शोधा

 Young man murdered in Sangli; Ten people arrested

विश्रामबाग येथील पूर्वा हॉटेलमागील श्रीरामनगर गल्ली क्रमांक तीनमधील एका पत्र्याच्या खोलीत तरुणाच्या डोक्‍यात बांबू घालून खून करण्यात आला. आकाश अशोक शिऱ्यापगोळ (वय 20, मूळ गोकाक) असे मृताचे नाव आहे.

सांगलीत तरुणाचा खून; दहा जणांना अटक
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः विश्रामबाग येथील पूर्वा हॉटेलमागील श्रीरामनगर गल्ली क्रमांक तीनमधील एका पत्र्याच्या खोलीत तरुणाच्या डोक्‍यात बांबू घालून खून करण्यात आला. आकाश अशोक शिऱ्यापगोळ (वय 20, मूळ गोकाक) असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र महेश ऊर्फ शशिकांत अणाप्पा कुल्लोळी (19, एस. टी. कॉलनी, विश्रामबाग) जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. 

सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आली. किरकोळ वाद आणि मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणातून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलिसांनी यांनी ही कारवाई केली. जखमी कुल्लोळी याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी सांगितले, की धर्मेश शंकर कांबळे (26, आर्या हॉटेलसमोर, गर्व्हर्न्मेंट कॉलनी), संभाजी मल्लाप्पा कांबळे (35, गर्व्हर्न्मेंट कॉलनी), उमेश अशोक कांबळे (26, गजराज कॉलनी), मनोहर मल्लाप्पा कांबळे (44, फरसाणा भट्टीजवळ, गर्व्हर्न्मेंट कॉलनी), गोरखनाथ अप्पासाहेब खंडागळे (24, इनामधामणी), केशव शिवलींग सुरगोंडा (24, मिरा कॉलनी), महेश उर्फ कुमार शंकर कांबळे (25, आर्या हॉटेलसमोर), विनायक मनोहर कांबळे (गर्व्हर्न्मेंट कॉलनी), आकाश ऊर्फ वामन प्रकाश गुरव, विशाल अण्णाप्पा कांबळे अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी माहिती दिली, की शिऱ्यापघोळ मूळचा गोकाक येथील आहे. वानलेसवाडी परिसरातील श्रीरामनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये आनंदराव चव्हाण यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. तेथे शिऱ्यापघोळ आणि त्याचे वडील सुरक्षारक्षक आहेत. जखमी कुल्लोळी त्याचा लहानपणीच्या मित्र आहे. तो सध्या कराड येथील एका हॉटेलमध्ये कामगार आहे. सुटी घेऊन तो सांगलीत आला होता. काल दोघेही दुपारी साडेतीनच्या सुमारास गव्हर्न्मेंट कॉलनीतील नाना-नानी पार्कमध्ये जात होते. त्यावेळी संशयित महालक्ष्मी चौकात थांबले होते. पूर्वीचा किरकोळ वाद आणि मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणातून संशयितांनी त्यांना खुन्नस दिली. त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. संशयितांनी भररस्त्यात धिंगाणा घातला. 

दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास पुन्हा संशयित श्रीरामनगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये गेले. त्यावेळी आकाश आणि त्याचा मित्र मद्यधुंद अवस्थेत होते. संशयितांनी रागाच्या भरात आकाश आणि शशिकांत यांच्यावर हल्ला चढवला. आकाशच्या डोक्‍यात बांबू आणि सिमेंटच्या पाईपने मारहाण केली. शशिकांतलाही मारहाण केली. त्यानंतर संशयित हल्लेखोर पसार झाले. जखमी अवस्थेत दोघेही तेथेच झोपले. अतिरक्तस्त्राव झाल्याने आकाशचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गील, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी पाहणी केली. 

संशयित कुंभार मळ्यात... 
पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनीही एक खास पथक तयार केले. त्यावेळी सात संशयित कुंभार मळा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, बिरोबा नरळे, मेघराज रूपनर, कुबेर खोत, वैभव पाटील, सागर टिंगरे, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तीयानी यांनी संशयितांना ताब्यात घेतले. मुख्य संशयित विनायक कांबळे, आकाश गुरव आणि विशाल कांबळे यांना विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने अटक केली. 

मैत्रिणीचा पाठलाग 
शिऱ्यापघोळच्या मैत्रिणीचा संशयितांनी पाठलाग केला होता. या कारणातून त्याचा आणि संशयितांचा वादा झाला होता. वादातूनच त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार संशयितांनी मारहाण केल्याचे कारण पोलिसांसमोर आले आहे. 

...तर जीव बचावला असता 
संशयितांनी बांबूने मारहाण केल्यानंतरही दोघेही तेथेच झोपले. आकाश जमिनीवर झोपला होता. जखमी शशिकांत बेडवर झोपला होता. रात्रीत अतिरक्तस्त्राव झाल्याने आकाशचा मृत्यू झाला. त्याचवेळी रुग्णालयात दाखल केले असते, तर जीव बचावला असता अशी चर्चा परिसरात होती.