जुन्या गाड्यांना नवं करणारा शौकीन बन्सी

संदीप खांडेकर
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

बन्सींची ही करामत टिपिकल कोल्हापूरचा बाणा दाखविणारी आहे. घरगुती खाणावळीत त्यांचे हात आता जरुर अडकले आहेत. जुन्या गाड्यांना नवं करण्याचा शौक मात्र त्यांनी सोडलेला नाही. 

कोल्हापूर - बन्सी यांना शिक्षणाचे डोस मानवले नाहीत. ते बिघडलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीत रमले. त्यांचं वेड मात्र मुलूखावेगळं. जुन्या नादुरुस्त बुलेट, घड्याळ, टेपरेकॉर्डरला पुन्हा चालतं-बोलतं करण्याचा त्यांचा भलताच छंद. कुटुंबीयांचे हात गणेशमूर्ती करण्यात, तर बन्सी यांचे हात गाड्यांना ठीकठाक करण्यात व्यस्त. शाहूपुरी सहाव्या गल्लीत राहणाऱ्या बन्सींची ही करामत टिपिकल कोल्हापूरचा बाणा दाखविणारी आहे. घरगुती खाणावळीत त्यांचे हात आता जरुर अडकले आहेत. जुन्या गाड्यांना नवं करण्याचा शौक मात्र त्यांनी सोडलेला नाही. 

महापालिकेच्या शाहूपुरीतल्या महात्मा फुले विद्यालयात बन्सी ऊर्फ शरद सदाशिव पुरेकर यांचा दाखला दाखल झाला. तिसरीत गाडी अडखळल्यानं शिक्षणाची त्यांनी फिकीर केली नाही. फरशी फिटींगच्या कामात स्वतःला वाहून घेतलं. त्या कामात्ही त्यांचे लक्ष लागले नाही. पुढे रिक्षाच्या बॉडी बिल्डिंगचं काम आत्मसात करण्यात रात्रीचा दिवस करू लागला. दुचाकी गाड्यांच्या दुरुस्तीचं वेड त्यांच्या डोक्‍यातून जात नव्हतं. त्यांचे खास ट्रेनिंग त्यांच्याकडं नव्हतं. घराच्या दारात स्वत:च गॅरेज टाकून ते मेस्त्री झाले. गाड्या दुरुस्तीच्या कामात त्यांचा जम बसत गेला.

बुलेटच्या दुरुस्तीच कोडं

नादुरुस्त बुलेटच्या दुरुस्तीच कोडं त्यांना सतावतं होतं. बुलेट म्हटल्यावर डोळ्यासमोर रॉयल एनफिल्ड येते. ब्रिटीश कंपनी. मात्र बुलेटचे विविध प्रकार. जुन्या बाजारातून गंजलेल्या बुलेटची खरेदी करून त्याच्या दुरुस्तीचा फॉर्म्युला ते शोधत राहिले. बुलेटच्या कामापुढे मेस्त्री हात का टेकतात, याचा उलगडा त्यांना होऊ लागला. बुलेटचे मटेरियल शोधताना त्यांची त्रेधातिरपीट उडायची. बुलेटच्या नादुरुस्तीचा छडा लावण्यात मजल-दरमजल ते यशस्वी ठरत गेले. नट-बोल्टच्या किरकोळ दुरुस्तीसह इंजिनची बांधणी, दुरुस्तीच्या टिप्स ते मांडत गेले.

दुरुस्तीतला ‘एक्‍सपर्ट मेस्त्री’

पुढे त्यांनी आठ-नऊ नादुरुस्त जुन्या बुलेट खरेदी केल्या. वीस ते तीस हजार रुपयांना खरेदी, दुरुस्तीसाठी पाच-दहा हजार खर्च, विक्री पन्नास ते साठ हजार, असं व्यावसायिक सूत्रं मांडण्यात ते बिनचूक ठरले. फोक्‍स वॅगन बिट्टलच्या १९५९च्या मॉडेलची खरेदी त्यांनी पंचवीस हजारला केली. ते मॉडेल पन्नास हजार रुपयांना विकले गेले. इंग्लंड मेड बीएसए व्‌ मॅचलेस असो अथवा कोणतीही गाडी असो,  त्यांच्या दुरुस्तीतला ‘एक्‍सपर्ट मेस्त्री’ असं बिरुद त्याच्या नावापुढं अल्पावधीत लागलं.

रेकॉर्ड प्लेअरच्या दुरुस्तीचंही भूत

बुलेटच्या दुरुस्तीबरोबरच यांच्या डोक्‍यात जुने टेपरेकॉर्डर, घड्याळ, रेकॉर्ड प्लेअरच्या दुरुस्तीचंही भूत शिरलं. त्याच्या तांत्रिक शिक्षणाचा श्रीगणेशा न गिरवताच हे आव्हान पेलण्यास ते सज्ज झाले. दहा - पंधरा जुन्या घड्याळांची दुरुस्ती केल्यानंतर नादुरुस्त पंधरा - सोळा रेकॉर्ड प्लेअर त्याच्या सोबतीला आले. काळ्या रंगाची गोलाकार रेकॉर्ड जमा करण्यातही ते मागे पडले नाहीत. त्यांच्याकडे १९४२ ते १९८० पर्यंतच्या सुमारे दोन हजार रेकॉर्डस संग्रही आहेत. त्यांना बोलतं करण्याचं काम त्यांनीच केलंय. रेकॉर्ड प्लेअर दुरुस्तीचं काम त्यांना कसं जमलं, हे अनेकांना पडलेलं कोड आहे.

गॅरेजच्या गाळ्यात घरगुती खाणावळीचा घमघमाट

चार वर्षांपूर्वी गॅरेजच्या गाळ्यात घरगुती खाणावळीचा घमघमाट सुरू झाला आहे. त्यांचा गाड्या दुरुस्तीचा शौक मात्र कायम आहे.  भवानी मंडपातील नगारखान्यामधील घड्याळाची टिकटिक सुरू करण्यासाठी अनेक जण सपशेल फेल ठरले. त्याला चावी देण्यात ते पास झाले. छत्रपती घराण्याच्या मेबॅक मोटारीच्या फिनिशिंगच कामही ते करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Young Man Re paring Various Old Vehicles