कऱ्हाडमध्ये युवकाचा खून 

vijay-pawar
vijay-pawar

कऱ्हाड - घरात एकट्याला गाठून युवकाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. 

येथील गजानन हाउसिंग सोसायटीत आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. विजय रामचंद्र पवार (वय 28) असे खून झालेल्याचे नाव आहे. खून कोणी केला व त्याचे कारण समजू शकले नव्हते. 

पोलिसांनी सांगितले, की विजय पवार वीज मंडळात सांगली येथे नोकरी करीत होता. त्याचे येथील गजानन हाउसिंग सोसायटीत घर आहे. आज तो घरात एकटाच होता. त्या वेळी घरात घुसून अनोळख्या लोकांनी त्याचा खून केला. त्याच्या चेहऱ्यावर सपासप वार केले आहेत. किमान दहा वार फक्त चेहऱ्यावरच आहेत. अन्य कोठेही जखम नाही. धारदार तलवारीसारखे शस्त्र वापरले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. अडीचच्या सुमारास विजयचा मित्र सदाशिव दोडमणी घरी आला, त्या वेळी ही घटना उघडकीस आली. त्याने तातडीने त्याबाबतची माहिती शेजारी राहणाऱ्या त्याच्या बहिणीला दिली. त्याचे भावोजी व अन्य मित्रांच्या सहकार्याने सदाशिव यांनी जखमी विजय यास खासगी रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालय सूत्रांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शोकाकूल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. 

सदाशिव दोडमणी याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की साडेअकराच्या सुमारास विजयने सदाशिवला फोन करून घरी बोलावले. दोन दिवसांपूर्वी विजय व त्याचे मित्र फिरायला गेले होते. त्या वेळी त्याचा पाय मुरगळला होता. त्याला नीट चालता येत नव्हते. त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी विजयने सदाशिवला बोलवले होते. सदाशिव घरी गेला त्या वेळी घरात विजय, त्याची बहीण, भाऊजी व मुले होती. विजय टीव्ही बघत होता. त्या वेळी त्याने कार खराब झाली आहे. ती सर्व्हिसिंग सेंटरवरून धुऊन आण म्हणून मला पाठवले. दुपारी दीडच्या सुमारास मी कार घेऊन परत आलो. त्या वेळी विजयच्या घराचा दरवाजा उघडा होता. दरवाजातून आत गेल्यानंतर तेथे कोणीच नव्हते. विजय चटईवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com