चांद्रयान 3 मोहिमेत कोल्हापूरच्या तरूणावर आहे 'ही' जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

धनेशची ओळख रोबो रायटरचा निर्माता, अशी असून विज्ञानविषयक विविध प्रकल्पांत त्याचा सक्रिय पुढाकार आहे. अंध आणि अपंग विद्यार्थ्यांची लेखनिकाची अडचण दूर करण्यासाठी इस्रोमध्ये काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांसह धनेशने रोबो रायटरची निर्मिती यापूर्वीच केली आहे.

कोल्हापूर - गेल्या सप्टेंबरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न अपुरे राहिल्यानंतर आता इस्रो मिशन २०२० अंतर्गत चांद्रयान ३ मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चांद्रयान ३ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेत येथील युवा संशोधक धनेश बोरा याची निवड झाली आहे. अतिसूक्ष्म उपग्रह (नॅनो टेक्‍नॉलॉजी बेस्ड्‌ सॅटेलाईट) आणि सेन्सर तयार करण्याची जबाबदारी त्याच्यासह पाच जणांवर असेल. दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या मुलाखतीतून इस्रोचे संचालक डॉ. सतीशराव यांनी धनेशची निवड केली.

धनेशची ओळख रोबो रायटरचा निर्माता, अशी असून विज्ञानविषयक विविध प्रकल्पांत त्याचा सक्रिय पुढाकार आहे. अंध आणि अपंग विद्यार्थ्यांची लेखनिकाची अडचण दूर करण्यासाठी इस्रोमध्ये काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांसह धनेशने रोबो रायटरची निर्मिती यापूर्वीच केली आहे. ज्याद्वारे अंध, अपंगांना लेखनिक मिळेल. शिवाय संपूर्ण शैक्षणिक वर्षांत तो त्यांच्याकडून अभ्यास करून घेईल, अवांतर वाचन करून घेईल. या रोबोला जगभरातील सर्व भाषांचे ज्ञान आहे. परीक्षेत विद्यार्थी सांगतील आणि रोबो रायटर प्रश्नपत्रिका लिहिणार, अशा पद्धतीने हा रोबो आता काम करणार आहे. या रोबोचा प्रत्यक्षात वापर सुरू झाल्यास देशातील तीस लाख अंध-अपंगांना याचा फायदा होणार आहे.

लई भारी - इंटरनेटवर शोध घेऊन त्याने बनवले बांबू स्लायसिंग मशीन  

‘इस्रो’ची टीम चांद्रयान -३ च्या मोहिमेत व्‍यस्‍त

चांद्रयान २ च्या अपयशातून खचून न जाता नव्याने ‘इस्रो’ची टीम पुढच्या मोहिमेसाठी कामाला लागली आहे. इस्त्रोने आतापर्यंत लॅंडिंग साईट, दिशादर्शनासह दहा महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले आहे. मोहिमेत लॅंडरचे पाय भक्कम करण्यावर अधिक भर दिला आहे. जेणेकरून वेगाने लॅंडिंग झाले तरी लॅंडर सुस्थितीत राहील. एकूणच हे इस्रोचे आश्‍वासक पाऊल ठरणार आहे.

ही अभिमानाचीच गोष्ट

चांद्रयान मोहिमेत संधी मिळणे, ही एक अभिमानाचीच गोष्ट असली तरी ती महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आमची टीम मोहिमेसाठी अतिसूक्ष्म उपग्रह आणि सेन्सर तयार करणार आहे.
- धनेश बोरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Scientist Dhanesh Bora In Chandrayaan 3 Mission