नेवरीत तरुणाचा भोसकून खून

नेवरीत तरुणाचा भोसकून खून

कडेगाव - नेवरी (ता. कडेगाव) येथील उमरकांचन वसाहतीमध्ये एका विवाहित महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी राजेंद्र मधुकर कारंडे (वय ४३) याने दारूच्या नशेत प्रदीप भिकाजी शिंदे (वय २३) या तरुणाचा धारदार चाकूने भोसकून खून केला. तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या संदीप भिकाजी शिंदे (वय ३१), शारदा राजेंद्र शिंदे (वय ४०, सर्व रा. उमरकांचन, नेवरी) यांनाही चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. 

पोलिसांनी संशयित राजेंद्र कारंडे याला पाठलाग करून पकडले. ही घटना शुक्रवारी (ता.२२) रात्री नऊच्या सुमारास घडली. याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नेवरी उमरकांचन येथील संशयित राजेंद्र कारंडे याचे याच वसाहतीतील एका तीस वर्षीय विवाहित महिलेशी गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तेव्हा हे प्रेमसंबंध त्याने बंद करून संबंधित विवाहितेची व तिच्या कुटुंबीयांची होत असलेली बदनामी थांबवावी, यासाठी समज देण्यासाठी फिर्यादी संदीप व मृत प्रदीप शिंदे या दोघा सख्ख्या भावांनी संशयित आरोपी राजेंद्र कारंडे याला काल शुक्रवारी (ता.२२) रात्री नऊ वाजण्याच्या पूर्वी आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी प्रदीप व संदीप यांनी संशयित राजेंद्र याला याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तो दारूच्या नशेत असल्याने  काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर आपल्या प्रेमसंबंधाला प्रदीप व संदीप हे विरोध करीत आहेत. असा राजेंद्र याच्या लक्षात आल्याने त्याने दारूच्या नशेतच आपल्या पॅंटच्या खिशातून आणलेला धारदार चाकू बाहेर काढून प्रदीप शिंदे याच्या पोटावर, छातीवर व दंडावर चाकूने सपासप वार करून भोसकले.  प्रदीप याचे अंगावर गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोळसला व जागीच ठार झाला. यावेळी प्रदीपचा सख्खा भाऊ संदीप व चुलती शारदा शिंदे या दोघांनी मिळून प्रदीपला हल्लेखोर राजेंद्र याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजेंद्र याने संदीप व शारदा शिंदे यांच्यावरही चाकूने हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या हातावर व पोटावर खोल वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

या घटनेची कडेगाव पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी राजेंद्र करांडे याने मोटारीतून (एम एच ०४ ए ए२७१९) धूम ठोकली. पोलिस निरीक्षक श्री. हसबनीस, सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या पोलिस पथकाने पाठलाग करून त्याला सोहोली (ता. कडेगाव) येथे अटक केली.
तर चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या संदीप व शारदा शिंदे यांना घटनास्थळी जमलेल्या लोकांनी उपचारासाठी विटा येथे खासगी दवाखान्यात दाखल केले.

या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास श्री. हसबनीस करीत आहेत, तर खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नेवरी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज संशयित राजेंद्र कारंडे याला कडेगाव न्यायालयात हजर केले असता येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी त्याला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com