वडिलांना निरोप देऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

महेश मारुती खाडे (वय २४, मूळ रा. मुसळवाडी, ता. राधानगरी, सध्या रा. कदमवाडी) असे त्याचे नाव आहे. बेरोजगारीला कंटाळून मुलाने हे पाऊल उचलल्याची चर्चा सीपीआरमध्ये सुरू होती. 

कोल्हापूर - ‘बाबा, तब्येत सांभाळा, सावकाश जाऊन तिरुपतीचे दर्शन घ्या...’ असा निरोप देऊन मुलगा घरी गेला. मुलाच्या अशा भावनिक पद्धतीने वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; मात्र ते रेल्वेत बसून हातकणंगले स्थानकावर पोचले ना पोचले तोच त्यांना तातडीने सीपीआरमध्ये या, असा निरोप नातेवाइकांनी दिला.

वडील घाईघाईत तेथे गेले. त्यावेळी मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी त्यांच्या कानावर पडली. तसा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. 

महेश मारुती खाडे (वय २४, मूळ रा. मुसळवाडी, ता. राधानगरी, सध्या रा. कदमवाडी) असे त्याचे नाव आहे. बेरोजगारीला कंटाळून मुलाने हे पाऊल उचलल्याची चर्चा सीपीआरमध्ये सुरू होती. 

याबाबत नातेवाईक व पोलिसांकडून मिळालेली माहिती, महेश खाडे हे कदमवाडीत कुटुंबांसोबत राहत होते. त्यांचे वडील एका हॉटेलमध्ये नोकरी करतात. महेश यांनी घरची बेताची परिस्थितीत खासगी नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. ते दोन-तीन ठिकाणी औषध दुकानात काम करत होते, मात्र त्यांना नोकरीत ब्रेक मिळाला. त्यामुळे ते सध्या बेरोजगार होते. त्यांच्या वडिलांनी पाच ते पाच महिन्यांपूर्वी तिरुपतीला जाण्याचे रेल्वेचे बुकिंग केले होते. त्यांची आज तिरुपतीला जाण्याची घाई होती. सकाळी ते मित्रांसोबत रेल्वेने तिरुपतीला जाण्यासाठी स्टेशनवर गेले. तेथे त्यांना सोडण्यासाठी मुलगा (महेश) गेले होते. त्यांनी बाबांना निरोप दिला. 

काही अंतर ते पुढे गेले आणि पुन्हा माघारी आले. बाबा तब्येत सांभाळा, काळजी घ्या, असे त्यांनी वडिलांना सांगितले. मुलगा असा भावनिक का झाला असावा, याची शंका वडिलांना आली, पण रेल्वे सुटली. ते त्याला निरोप देऊन तिरुपतीच्या दर्शनासाठी पुढे निघाले. 

दरम्यान, महेश खाडे यांनी घरी सकाळी पंख्याला नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेतला. हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात आला. त्यांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्यानंतर त्याच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी आक्रोश केला.

Web Title: Youngster suicide incidence in Kadamwadi Kolhapur