सांगलीत टवाळखोर तरुणांना वेगाची झिंग 

सांगलीत टवाळखोर तरुणांना वेगाची झिंग 

सांगली - दोनशे..तीनशे "सीसी' क्षमतेहून अधिक ताकदींच्या गाड्यांचा "धूम स्टाईल' बेदरकार थरार आणि कानठळ्या बसवणारा हॉर्नचा कर्णकर्कश्‍श आवाज त्यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडते. अशा गाडीचे फायरिंगच एवढे भयानक असते की गाडी जवळून गेली तरी छातीत धस्स होते. रस्त्यावर थरार निर्माण करणाऱ्या गाड्यामुळे अपघाताची शक्‍यता नाकारताच येत नाही. गाड्यांचा नंबर टिपणे तर अशक्‍यच बनते. काही सेकंदातच या गाड्यांचे स्वार गर्दीतून नाहीसे होतात. त्यांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी "स्पीड गन' आणि वाहतूक पोलिसांची करडी नजरच आवश्‍यक आहे. 

कॉलेज तरुणांना अलीकडच्या काळात किमान 200 सीसी क्षमतेहून अधिक ताकदीच्या दुचाकींनी भुरळ घातली आहे. दुचाकीची जेवढी ताकद अधिक तेवढी पसंती असे चित्र दिसून येते. दुचाकीवर नव्हे तर वेगावर स्वार होण्याची नशा तरुणाईला चढली आहे. सांगलीसारख्या शहरात अपवाद वगळता अनेक रस्ते खराब आहेत. मात्र येथे "हयाबुसा' आणि "हर्ले डेव्हीडसन' सारख्या ताकदवान दुचाकी धावताना दिसतात. या दुचाकीच्या फायरिंगचा आवाजच इतका दणदणीत आहे की दुचाकी जवळून गेली तरी छातीत धस्स होईल. हजार सीसीहून अधिक क्षमतेच्या दुचाकी बोटावर मोजण्या इतपत असतील. परंतु याच प्रकारच्या गाड्यांच्या श्रेणीत समावेश होईल अशा 200 सीसीहून अधिक क्षमतेच्या गाड्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. 

"धूम स्टाईल' ने गर्दीतून वाट काढत वेगाने पसार होण्याची फॅशन अनेक तरुणांच्यात दिसते. समोरच्या दुचाकीला "कट' मारत "ओव्हरटेक' करताना पूर्ण दुर्लक्ष केले जाते. वाट मिळत नसेल तर कर्णकर्कश्‍श आवाज हॉर्नमधून बाहेर काढला जातो. वेगावर स्वार झालेल्या तरुणांच्या दुचाकीचा नंबर टिपता येत नसल्यामुळे तक्रार कोणाकडे? आणि कशी करायची? असा प्रश्‍न पडतो. वेगवान दुचाकी स्वारांना टिपण्यासाठी सांगली वाहतूक नियंत्रण शाखेने "स्पीड गन' आणली आहे. "स्पीड गन' द्वारे अनेकांना टिपून वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. परंतु सध्या "स्पीड गन' द्वारे कारवाई थंडावली आहे. 

हजार रुपये दंड 
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आळा बसावा म्हणून दंडामध्ये वाढ केली आहे. किमान 200 रुपयांपासून पुढे दंड आकारला जातो. रॅश ड्रायव्हिंग, वेगाने वाहन चालवणे आणि रस्त्यावर रेसिंग करणे यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. याप्रमाणे अधिक कारवाई केली तर वेगाला आवर घालता येऊ शकेल. तसेच प्रेशर हॉर्न वाजवल्यास दोनशे रुपये दंडाची तरतूद नवीन नियमानुसार करण्यात आली आहे. 

वेग दर्शवणारे फलक गायब 
"स्पीड गन' द्वारे कारवाई करण्यापूर्वी संबंधित रस्त्यावर वेग किती असावा? हे दर्शवणारे फलक काही महिन्यांपूर्वी उभारले. परंतु तकलादू फलक केव्हा गायब झाले ते कोणालाच कळाले नाही. त्यामुळे "स्पीड गन' द्वारे कारवाई सध्या थंडावली आहे. कारवाई करायला गेले तर वाहन चालक वेगाचा फलक कोठे आहे? असे विचारतात. त्यामुळे महापालिकेने पुन्हा वेगाचे फलक लावण्याची गरज आहे. 

सायकलसाठीही रस्ते खराब 
हायस्पीड दुचाकींसाठी परदेशात खास रस्ते आहेत. त्याच रस्त्यावर स्पर्धा होतात. परंतु सांगलीतील अनेक रस्ते सायकल चालवण्यासाठीही लायक नाहीत. परंतु अशा रस्त्यावरील गर्दीत हायस्पीड दुचाकी चालवणे चालकासाठी तर धोकादायकच आहे. शिवाय इतरांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे धोका निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारांना कारवाईचा लगाम घातलाच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com