सांगली : युवक कॉंग्रेसच्या विविध पदांसाठीच्या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण

sangali
sangali

सांगली : युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आज तिसऱ्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

जिल्ह्यातील नोंदणीकृत 18 हजार 767 मतदारांपैकी 7058 जणांनी मतदान केले. "टॅब' वर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्षांच्या मतमोजणीचा निकाल गुरूवारी (ता.13) रोजी दुपारी 12 वाजता जाहीर होईल. निवडणूक निरीक्षक भगवती प्रसाद यांनी ही माहिती दिली.  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युवक कॉंग्रेसच्या निवडी संपूर्ण राज्यभर होत आहे. निवडीपूर्वी गेल्या सहा महिन्यापासून सदस्य नोंदणीची मोहीम राबवली गेली.

प्रदेशाध्यक्षपदासाठी यंदा आमदार अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत. प्रदेश महासचिव पदासाठी सांगली लोकसभा युवक कॉंग्रेसचे इंद्रजित साळुंखे, सागर कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख, श्रेयश इंगोले उभे आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. सुशिल गोतपागर, नगरसेवक मंगेश चव्हाण, संदीप जाधव, शोभा खांडेकर, वैभवराज पवार हे उभे आहेत. जिल्हा महासचिवपदासाठी दिनेश सोळगे, जहीरअहमद मुजावर, निशा पाटील, रमेश कोळेकर, ऋषिकेश पाटील, सचिन पाटील, सुधीर जाधव, सुजीत लकडे, सुमित गायकवाड हे उभे आहेत. तसेच आठ विधानसभा मतदारसंघासाठी स्थानिक उमेदवार रिंगणात होते.  

जिल्ह्यात 9 सप्टेंबरला पलूस मतदारसंघासाठी मतदान झाले. मंगळवारी (ता. 11) खानापूर, तासगाव, मिरज मतदारसंघासाठी मतदान झाले. तर आज सांगली, इस्लामपूर, जत, शिराळा मतदारसंघासाठी मतदान झाले. सदस्य म्हणून नोंदणी झालेल्या मतदारांना ओळखपत्र पाहून मतदानाची संधी दिली गेली. प्रत्येकाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव आणि विधानसभा अध्यक्ष अशा पाचजणांना मतदान करण्याचा अधिकार दिला गेला. "टॅब' वर मतदान नोंदणी करण्यात आली. दिल्लीहून आलेले निरीक्षक भगवती प्रसाद आणि त्यांचे सहकारी यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली.    

पलूसला सर्वाधिक मतदान -  
जिल्ह्यात पलूस विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3624 जणांनी मतदान केले. आमदार विश्‍वजीत कदम यांनी सदस्य नोंदणी जोरदार केल्याचे दिसून आले. त्याखालोखाल मिरज- 730, खानापूर- 582, सांगली- 579, इस्लामपूर- 567, तासगाव- 516, शिराळा- 321, जत- 139 याप्रमाणे एकुण 7058 मतदान झाले.

बाहेरील मतदानामुळे वाद -  
आज सकाळी आठ वाजता सांगलीत कॉंग्रेस कमिटीजवळ मतदान प्रक्रिया सुरू झाली. दहाच्या सुमारास बाहेरील जिल्ह्यातील काही सदस्य गाड्या भरून मतदानासाठी आले. त्यांनी भराभर मतदान केले. या प्रकाराला स्थानिक उमेदवार व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे थोडा वाद झाला. याबाबत तक्रार करण्यात आल्याचे समजते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com