"युवक कॉंग्रेस'ची निवडणूक बिनविरोध? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सातारा - नेत्यांतील वाद "युवक कॉंग्रेस'मध्ये नकोत, अशी भूमिका घेत युवक कॉंग्रेसची निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने जिल्हा कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस "युवक'चे जिल्हाध्यक्षपद वाई तालुक्‍याला दिले जाणार आहे. 

सातारा - नेत्यांतील वाद "युवक कॉंग्रेस'मध्ये नकोत, अशी भूमिका घेत युवक कॉंग्रेसची निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने जिल्हा कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस "युवक'चे जिल्हाध्यक्षपद वाई तालुक्‍याला दिले जाणार आहे. 

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत कोणत्याही नेत्यांच्या नातेवाईकांना संधी न देण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे. प्रत्येकाला आपापल्या अपेक्षेप्रमाणे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ठरविण्याची मुभा दिली आहे. युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करताना एकमेकांविरोधात अर्ज दाखल न करण्याची भूमिका नेतेमंडळींनी घेतली आहे. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला "युवक'मध्ये स्थान देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युवक कॉंग्रेसची निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. काल (ता. 26) उमेदवारी अर्ज दाखल झालेत. या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यानंतर पाच ते सहा सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. एकूणच विरोधात अर्ज दाखल झालेले नसल्याने काही जागा बिनविरोध होतील. ज्या जागेवर दोन अर्ज आहेत, तेथील एका उमेदवाराला "प्रदेश'वर जाण्याची संधी मिळू शकते. युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी वाई तालुक्‍याला संधी दिली जाणार आहे. त्यानुसार नेते मंडळींनी तयारी केली आहे. मदन भोसले यांच्या समर्थकाला संधी मिळेल. 

दरम्यान, जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोधच्या वाटेवर असली तरी उपाध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक जणांनी अर्ज दाखल केल्यास पुन्हा येथे जिल्हाध्यक्षाची अडचण होणार आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठीही एकच अर्ज दाखल व्हावा, यासाठी नेतेमंडळींनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

कॉंग्रेस "वादमुक्त' करण्याचा प्रयत्न 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची जिल्ह्यात वाटचाल सुरू आहे. पण, काही कारणांनी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरेंमध्ये तात्विक वाद निर्माण झालेत. त्यातून कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांतही दुफळी निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक होत आहे. युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस वादमुक्त करण्याचा प्रयत्न नेतेमंडळींचा सुरू आहे.

Web Title: Youth Congress election unopposed