संगमनेरमध्ये चोराच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

आनंद गायकवाड
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

रस्त्यावर चाललेली झटापट पाहून तो थांबला. मात्र, तो विरोध करील, या भीतीने चोरांनी पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली व दुसरी गोळी शर्मा याच्यावर झाडली. ती गोळी मांडीतून पोटात घुसल्याने, शर्मा गंभीर जखमी झाले. ही संधी पाहून चोरांनी पळ काढला. 

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच्या "माझे घर सोसायटी'जवळ बुधवारी (ता.5) सायंकाळी चोराच्या गोळीबारात परप्रांतिय तरुणाचा मृत्यू झाला. अविनाश सुभाष शर्मा (वय 33, रा. संगमनेर) असे त्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहराजवळच्या घुलेवाडी येथील एक सराफ व्यावसायिक बुधवारी सायंकाळी दुकान बंद करून मोटारीतून घरी जात होता. चोरांनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. "माझे घर सोसायटी'कडे वळणाऱ्या रस्त्यावर त्यांनी सराफाची मोटार अडविली. धमकावित सराफास मोटारीतून बाहेर काढून त्यांच्या हातातील "बॅग' हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मित्रासमवेत अविनाश शर्मा तेथून जात होता.

रस्त्यावर चाललेली झटापट पाहून तो थांबला. मात्र, तो विरोध करील, या भीतीने चोरांनी पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली व दुसरी गोळी शर्मा याच्यावर झाडली. ती गोळी मांडीतून पोटात घुसल्याने, शर्मा गंभीर जखमी झाले. ही संधी पाहून चोरांनी पळ काढला. 

जखमीची प्रकृती चिंताजनक

जखमी अवस्थेतील अविनाश शर्मा यांना तातडीने संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे तरुणाचा मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित व पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेतील शर्मा यांचा मॉड्यूलर किचन ट्रॉली बनविण्याचा व्यवसाय आहे. याबाबत रात्री उशिरारपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

पोलिस पथके रवाना

घुलेवाडी शिवारातील "माझे घर सोसायटी' परिसरात घडलेली गोळीबाराची घटना सत्य आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. 
- पोलिस निरीक्षक अभय परमार, संगमनेर शहर पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth died in firing of thieves in sangamner