संगेवाडी (जि.सोलापूर) : सांगोला तालुक्यातील हक्काच्या टेंभूच्या पाण्यासाठी तरुणपिढी पक्ष, पार्ट्या सोडून एकत्रित लढा उभारु लागले आहेत. सोशल मीडियाचा वापर करुन शेतकऱ्यांना सोबत घेऊन तरुणांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. आता पाणी मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे तरुण आवर्जून सांगत आहेत.
सांगोल्याच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणीप्रश्नावरच संपूर्ण तालुक्यातील विविध निवडणुका लढविल्या जात आहेत. विविध पक्ष आपल्यापरीने पाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तालुक्यामध्ये सध्या म्हैसाळ व टेंभूचा पाणीप्रश्न पेटला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणार आहे. पुढील काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आता पाणी नाही मिळाले तर अनेक गावांना पिण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही हा धोका ओळखून या लाभक्षेत्रातील मान नदीकाठच्या गावातील तरुण एकत्रित येऊन त्यांनी टेंभूच्या पाण्यासाठी लढा उभा केला आहे.
टेंभुचे पाणी सध्या बुद्धेहाळ तलावात सुरु असून त्याचा वेग वाढवून मेथवडेपर्यंत प्रथम पाणी सोडून पुढे टप्प्या-टप्प्याने यावरील बंधारे भरल्यास पुढील पिण्याचा व जणावरांचा पाणीप्रश्न काहीअंशी तरी मिटेल, अशी मागणी तरुणांमधून होत आहे. तालुक्यातील वाटंबरे, येलमार मंगेवाढी, नाझरे, चिणके, अनकढाळ, अकोला, वासुद, सांगोला, कडलास, वाढेगाव, सावे, बामणी, मांजरी, मेथवडे आदी गावांतील तरुणांनी ढेंभुच्या पाण्यासाठी एकत्रित लढा उभा केला आहे.
निवेदने, रास्ता रोको, उपोषण या विविध मार्गाने त्यांचा संघर्ष सुरु आहे. यापुढे पाणी न मिळाल्यास सर्वांना बरोबर घेऊन पाण्यासाठी बिगरराजकीय आंदोलन तरुणपिढी करणार आहेत. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करुन हक्काच्या पाण्यासाठी लढा उभा केला आहे.
''टेंभूचे पाणी 18 सप्टेंबर रोजी सुरु झाले असून पहिल्या टप्प्यात आटपाडी, कवटेमंहकांळ, सांगोला भागात मागणीनुसार पाणी दिले आहे. टंचाईकाळामुळे सगळीकडूनच पाण्याची मागणी वाढत आहे. पुढील टंचाई नियोजनानुसार सांगोल्यातील लाभक्षेत्रातील भागास पाणी दिले जाईल''.
- राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन योजना.
''टेंभूचे पाणी मेथवडेपर्यंत न मिळाल्यास या लाभक्षेत्रातील १४ गावांत चुलबंद आंदोलन केले जाईल. आता पाण्याची लढाई आर या पार होईल''.
- विजय बाबर, तालुका उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.