पूर्ववैमनस्यातून सांगली जिल्ह्यात तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

आष्टा - पूर्ववैमनस्य आणि त्यातून एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून मामा-भाचे अशा तिघाजणांनी तलवार, चाकूने केलेल्या खुनी हल्ल्यात अनिकेत ऊर्फ बबलू शिवाजी फार्णे (वय २५, रा. मूळ गाव मिणचे, सध्या शिगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. तर सौरभ संभाजी चव्हाण (वय २०) हा गंभीर जखमी झाला. 

आष्टा - पूर्ववैमनस्य आणि त्यातून एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून मामा-भाचे अशा तिघाजणांनी तलवार, चाकूने केलेल्या खुनी हल्ल्यात अनिकेत ऊर्फ बबलू शिवाजी फार्णे (वय २५, रा. मूळ गाव मिणचे, सध्या शिगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. तर सौरभ संभाजी चव्हाण (वय २०) हा गंभीर जखमी झाला. 

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शिगाव (ता. वाळवा) येथे ही घटना घडली. सौरभ चव्हाण याने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांत शैलेश घाडगे, नीलेश घाडगे, मामा विश्‍वास लोंढे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

नवरात्राची सांगता, दसरा सणादिवशीच दोन दिवसांतल्या सलगच्या मारामाऱ्यांमुळे शिगावात तणावपूर्ण वातावरण आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अनिकेत आणि शैलेश घाडगे यांच्यात काही दिवसांपासून वाद होता. यावरूनच मागील वर्षीच्या शिगाव येथील हनुमान यात्रेत दोघांत वाद, भांडण झाले होते. तेव्हापासून शैलेश हा अनिकेतवर चिडून होता. यातून मंगळवारी नवरात्रोत्सवातील मिरवणुकीदरम्यान दोघांत वाद झाला. सायंकाळी सौरभ व अनिकेत हे शिगाव येथील तरुण भारत चौकात उभे होते.

या वेळी उमेश सहदेव चव्हाण तेथे आला. त्याने शैलेश व नीलेश हे अनिकेतला मारणार असल्याचे सांगितले. याची विचारणा करण्यासाठी दोघेजण शैलेशच्या घराजवळ गेले. तेथे शैलेश, नीलेश व त्याचा मामा विश्‍वास हे होते. अनिकेतने विचारणा करताच शैलेश व नीलेश हे घरात आत गेले. घरातील तलवार, चाकू घेऊन बाहेर आले. शिवीगाळ करीत नीलेशने तलवारीने अनिकेतच्या तोंडावर वार केला. शैलेशने चाकूने छातीवर, हातावर वार केले. विश्‍वास याने अनिकेतला पकडून ठेवले. सौरभ हा सोडवण्यासाठीमध्ये गेला असता शैलेशने त्याच्या पाठीत चाकूने वार केला.

अनिकेत खाली पडला होता. नीलेशने खाली पडलेला चिऱ्याचा दगड उचलून अनिकेतच्या छातीवर घातला. इतक्‍यात नीलेश चव्हाण, उत्तम फार्णे, अस्लम नदाफ तेथे आले. तेव्हा तिघेजण निघून गेले. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. चौघाजणांनी त्याला जखमी अवस्थेत आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने डॉक्‍टरांनी गाडीतच तपासणी करून सांगलीला नेण्यास सांगितले.

सांगली सिव्हिल येथे नेले असता डॉक्‍टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दिलीप ढेरे पथकासह शिगावात दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. संशयितांना शोधून ताब्यात घेतले. जखमी सौरभवर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत अनिकेत हा महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत वायरमन होता. काही महिन्यापूर्वीच अंबप येथे बदली झाली होती. त्याचे वडील सेवानिवृत्त वायरमन आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप ढेरे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth murdered in Sangli district