इस्लामपूर : निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

इस्लामपूर - महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असला तरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून लढावेच, असा निर्धार निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी आज येथे व्यक्त केला. निशिकांतदादांनी निवडणूक रिंगणात उतरावे, असा आग्रह करत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. 

इस्लामपूर - महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असला तरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून लढावेच, असा निर्धार निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी आज येथे व्यक्त केला. निशिकांतदादांनी निवडणूक रिंगणात उतरावे, असा आग्रह करत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. 

महायुतीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या नगराध्यक्ष पाटील यांच्यासमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्यातून त्यांनी माघार घेऊ नये म्हणून आज समर्थक दत्तटेकडी परिसरातील त्यांच्या निवासस्थासमोर जमले. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

‘काही झाले तरी दादांनी लढलेच पाहिजे’ असा आग्रह धरला. तरुणांनी मनोगते व्यक्त केली. त्यात श्री. पाटील यांनी दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षवाढीसाठी चांगले काम केले. कोणताही भेद न करता सर्वसमावेशक काम केले. काहींनी आर्थिक आमिषापोटी लाचारी पत्करून दादांशी दगाबाजी केली. दादांना तिकीट मिळू नये यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत सेटलमेंट केली. दादांनी धीर न सोडता पुन्हा खंबीर उभे रहावे. पक्ष नाही तर अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवावी.’’ 

या दरम्यान रवी चव्हाण या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला घेत समजूत काढली. निशिकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते तेथून जुन्या तहसील कार्यालय  आवारात आले. ‘निशिकांतदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करीत दुचाकी रॅली काढली. श्री. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 

भाजप कार्यालयात आल्यानंतर श्री. पाटील म्हणाले,‘‘सामान्य कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे. गेल्या दोन वर्षांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. मात्र काही लोकांनी केलेल्या सेटलमेंटमुळे घात झाला. आता या निवडणुकीत ही सेटलमेंट गाडून टाकण्याची वेळ आली आहे. पक्षाला न दुखावता  कार्यकर्ता हाच पक्ष मानून अपक्ष म्हणून निवडणूक लढवू.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth suicide attempt for Nishikant Patil candidacy