युवा शक्‍तीचा अभूतपूर्व एल्गार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

बेळगाव - काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांच्या हुंकाराने मंगळवारी (ता. 1) बेळगावचा आसमंत निनादला. शहर व तालुक्‍यातील मराठी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने यंदाची काळा दिन फेरी न भूतो न भविष्यती अशीच झाली.

बेळगाव - काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांच्या हुंकाराने मंगळवारी (ता. 1) बेळगावचा आसमंत निनादला. शहर व तालुक्‍यातील मराठी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने यंदाची काळा दिन फेरी न भूतो न भविष्यती अशीच झाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली जागृती, कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर वारंवार होत असलेला अन्याय आणि कानडीकरणाच्या वरवंट्यामुळे यंदाच्या काळ्या दिनाच्या फेरीत मराठी तरुणांचा सहभाग वाढणार अशी अटकळ आधीच बांधण्यात आली होती. प्रत्यक्षात फेरीतील तरुणांचा सहभाग अपेक्षेपेक्षाही जास्तच होता. काळा वेश परिधान केलेले, हातात भगवे व काळे झेंडे घेतलेले तरुण व त्यांच्या तोंडून अखंडपणे बाहेर पडणाऱ्या कर्नाटक व केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा पाहून सीमालढ्याची पालखी मराठी तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे स्पष्ट झाले. मराठी तरुण सीमाप्रश्‍नाबाबत आग्रही नाही, त्याला सीमाप्रश्‍न नको आहे अशी आवई उठविणाऱ्यांना आणि मराठी भाषिक असूनही काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी न होण्याचे आवाहन करून मराठी तरुणांचा बुद्धिभेद करू पाहणाऱ्या सूर्याजी पिसाळांना मंगळवारी चोख उत्तर मिळाले. युवा शक्तीचा अभूतपूर्व एल्गार मंगळवारी काळ्या दिनाच्या फेरीत पाहावयास मिळाला. यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासनही हादरले.

कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चात सीमाभागातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर मराठा मोर्चाच्या धर्तीवर काळ्या दिनाची फेरीही अभूतपूर्व झाली पाहिजे, यासाठी तरुणांचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती सुरू झाली होती. सोशल मीडियावर मराठी तरुण सक्रिय झाल्याचे पाहून काही कन्नड संघटना व कन्नड प्रसारमाध्यमांनी त्याचा बाऊ केला. मराठी तरुणांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला. यामुळे, चवताळलेल्या मराठी तरुणांनी मोठ्या संख्येने फेरीत सहभाग घेतला. मराठी आवाज दडपण्याच्या प्रयत्नाला तरुणांनी त्याच भाषेत उत्तर दिले. फेरीत त्यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा तर दिल्याच, शिवाय बेळगाव महाराष्ट्राचेच आहे आणि बेळगावला महाराष्ट्रात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे ठणकावून सांगितले.

Web Title: Youth unprecedented power