मोबाइलवर सातत्याने ‘पब जी’ खेळल्याने तरुण अत्यवस्थ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - मोबाइलवर सातत्याने ‘पब जी’ खेळल्याने महाविद्यालयीन तरुणाचे एकाएकी मानसिक संतुलन बिघडल्याचा धक्‍कादायक प्रकार आज सीपीआरमध्ये पाहायला मिळाला. पन्हाळा तालुक्‍यातील त्या १९ वर्षांच्या तरुणाची ही दयनीय स्थिती दिवसभर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली.

कोल्हापूर - मोबाइलवर सातत्याने ‘पब जी’ खेळल्याने महाविद्यालयीन तरुणाचे एकाएकी मानसिक संतुलन बिघडल्याचा धक्‍कादायक प्रकार आज सीपीआरमध्ये पाहायला मिळाला. पन्हाळा तालुक्‍यातील त्या १९ वर्षांच्या तरुणाची ही दयनीय स्थिती दिवसभर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली.

सीपीआरमधील उपचारानंतर त्याची मानसिक स्थिती स्थिर झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरी हलवले. ‘पब जी’मुळे मानसिक स्थिती बिघडल्याची पहिलीच घटना जिल्ह्यात घडल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.  
‘पब जी’मुळे महानगरांमध्ये अनेकांची दैना झाली आहे. या खेळाचे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे, याची प्रचिती आज सीपीआरमधील डॉक्‍टर आणि तेथील कर्मचाऱ्यांना आली. स्वतःच्या अस्तित्वाचाच विसर पडलेल्या या तरुणाचे स्वतःवर नियंत्रण नव्हते. तो असंबद्‌ध बोलत होता. त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

हा तरुण गेल्या काही दिवसांपासून कोणाशीच फारसा बोलत नव्हता. दिवसभर बंद खोलीत बसून राहायचा. आज सकाळी तो आरडाओरडा करू लागला. हातपाय झाडू लागला. आई-वडिलांनी त्याला तत्काळ सीपीआरमध्ये आणले. येथेही तो मोठ्याने ओरडत होता. डॉक्‍टरांनी त्याचे हातपाय पकडून ठेवले. त्याचे डोळे डॉक्‍टरांनी तपासले. या वेळी तो सातत्याने मोबाईल किंवा टी. व्ही. पाहत असल्याची शक्‍यता त्यांनी वर्तवली. तो सतत मोबाइलवर ‘पब जी’ खेळत असे, अशी माहिती तेथे असणाऱ्या त्याच्या मित्रांनी दिली. त्याच्याजवळील मोबाइल काढून घेतला, तर तो वादावादी करायचा, असेही त्यांनी सांगितले. या तरुणाची घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्याचे आई-वडील शेतात मजुरी करतात. हा सारा प्रकार पाहून ते घाबरले. सीपीआरमधील उपचारानंतर तरुणाची मानसिक स्थिती स्थिर झाली. त्यानंतर त्याचे पालक त्याला घरी घेऊन गेले. 

हा तरुण मोबाइलवर सतत ‘पब जी’ गेम खेळत असल्याचे सांगण्यात आले. त्याची तपासणी केल्यावर त्याची मानसिक स्थिती बिघडल्याचे लक्षात आले. त्याच्यावर उपचार केल्यावर त्याचे पालक घरी घेऊन गेले; मात्र त्याची ही अवस्था ‘पब जी’ गेममुळेच झाली असल्याचे दिसून आले. ‘पब जी’ वा तत्सम गेम खेळू नयेत. 
- डॉ. विजय बर्गे,
वैद्यकीय उपाधीक्षक, सीपीआर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth upset by constantly playing Pub G on mobile