सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ?

रविकांत बेलोशे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

जावळी तालुक्‍यातील चार युवक, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत समाजात आपल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या आदिम इच्छाशक्ती आणि आयुष्याच्या सकारात्मक ऊर्मीला अगदी धडधाकट समाजालाही सलाम करावा लागेल. 

भिलार (जि. सातारा) : "सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा!' ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणस या जगात आहेत.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

तशीच आपल्या आयुष्यात अनेक कमतरता असतानाही गाण म्हणत म्हणजे अगदी आनंदी जगणारी माणसही दिसतात. निसर्गाने काहींच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवलीय, काही उमेदीत आल्यावर अपघाताने विकलांग झाली आहेत, काही जन्मजात अपंग आहेत अशा अपंग- विकलांगांच आयुष्य म्हणजे तर एक कायम झगडण असत. अशा प्रतिकूल स्थितीतही ते अपंगत्वावर मात करीत आपलं आयुष्य जगत आहेत. स्वावलंबनाने आपल्या पायावर उभे आहेत. धडधाकट व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी करून ते आपले संसारही चालवत आहेत.

 

पानटपरीतून आयुष्याशी देतोय झुंज 

शिंदेवाडी (ता. जावळी) :  येथील सुरेश (बाळू) खंडागळे हा युवक जन्मजात दोन्ही पायांनी लुळा. चालणेही मुश्‍कील; पण पाय अपंग असले म्हणून काय झाले. हाताच्या दोन्ही पंजावर तो मार्गक्रमण करत आपला रोजचा दिनक्रम चालवतो. अंपगत्वाने शिक्षण जेमतेम चौथीपर्यंतच झाले. आयुष्याची लढाई स्वतःलाच लढावी लागणार म्हणून तो काहीही काम करू लागला.

अगदी वाळूची गाडी तो एकटा खाली करीत होता. अगदी जिद्दीने खाचखळग्यांच्या रस्त्यावरही तो आपल्या गुळगुळीत हातानी चालतोय. आता उमेदीत तो थ्री व्हीलर गाडी स्वतः चालवतोय आणि पाचगणीत या गाडीत त्याने आपलं रस्त्याशेजारी छोटं पानपट्टीवजा दुकान सुरू केलं आहे. रोज गाडी घरून तिथपर्यंत नेऊन तो यशस्वी व्यवसाय करतो; पण त्याला अनधिकृतचा शिक्का पडल्याने तो अपंगत्वाबरोबरच व्यवसाय करण्यासाठीही अक्षरशा झुंज देतोय.

टेलरिंग मशिन दुरुस्तीने गवसला सूर 

दुसरा याच शिंदेवाडीतील नीलेश बबन शिंदे हा युवक. शाळेमध्ये शिकताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. जेमतेम 14 ते 15 वर्षांचा दहावीत असताना सगळं सुरळीत सुरू असताना तो एका बाजूने विकलांग झाला. 
बरेच इलाज झाले; पण तो आहे तसा राहिला. अगदी दुसऱ्याच्या आधारावरच त्याला चालावे लागते; पण वय वाढत गेले तसं आपल्या कुटुंबावर आपला बोजा वाढतोय म्हणून तो इरेला पेटला.

काही दिवस बैठी इलेक्‍ट्रिकलची कामे केली आणि त्याला सूर गवसला. पुण्यात आपल्या चुलत्यांकडून टेलरिंग मशिन रिपेरिंग शिकला आणि तो निष्णात मेकॅनिक झाला. आज त्यांच्याकडे हिरो होंडा दुचाकी आहे. दोन चाके वाढवून बनवून घेतलेल्या गाडीपर्यंत तो धडपडत जातो आणि त्या गाडीने तो वाईपर्यंत एका टेलरिंग मशिन रिपेरिंग दुकानात कामाला जातो. पाय चालत नाहीत म्हणून तो घरात न बसता वादळवाऱ्यात गर्दीतून मार्गक्रमण करीत आयुष्याची लढाई लढतोय. कधीही अपंग आहे म्हणून कंटाळा न करता तो अविश्रांतपणे काम करत आयुष्याची वाट शोधतोय. 

दुकान टाकून शोधला उदरनिर्वाहाचा मार्ग 

काटवली येथील सुनील शिंदे हा लहानपणापासूनच पोलिओ रुग्ण. एक पाय पूर्णपणे विकलांग आहे. कुबडीशिवाय त्याला चालता येत नाही. शिक्षण जेमतेम झालेले. घरात बसून काय करायच म्हणून तो टेलरिंग शिकला. काही दिवस टेलरिंगचा व्यवसाय केला; पण अपंगत्व असल्याने त्याला थकवा जाणवू लागला. विकलांग आयुष्य नशिबी आल्यामुळे कधी खचला नाही. अनेक मार्ग शोधत राहिला. थोडा निराश झाल्याने सुनील पुन्हा आता एक टपरी टाकून त्याने पानपट्टी सुरू केली आहे. त्यातून त्याने आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. 

अपंगत्वाला विसरून ते समाज हितासाठी झटतात

भालेघर या डोंगर माथ्यावरील गावात शिवाजी पवार हा अपंग युवक वजा सामाजिक कार्यकर्ता आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या भविष्याची काळजी करतोय. लहानपणापासूनच दोन्ही पायांनी अपंग असणारे शिवाजीराव चौथी शाळा शिकले; पण काही काळ गावचे सरपंचपद भूषविले; पण बैठका व इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दुसऱ्यांनी खांद्यावर उचलून न्यावे लागत असे.

विकासकामांसाठी नेत्यांकडे भांडणारा हा असामी स्वतःसाठी कधी भांडत नाही. अपंगत्वाला विसरून ते सभोवतालच्या समाज हितासाठी नेहमी सक्रिय असतात. अपंग असूनही डोंगरदऱ्या कधी लडखडत कधी दुसऱ्याच्या आधारावर पालथ्या घालणाऱ्या शिवाजीरावांना आस आहे, अपंगांकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहण्याची, त्यांना सांभाळून घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याची. 

अवश्य वाचा :  महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार 

या युवकांची अपंग असूनही जगण्यासाठीची जिद्द, चिकाटी आणि धडपड पाहिली की डोळ्यात अक्षरशः पाणी येत. धडधाकट असूनही जीवनाकडे मौज म्हणून पाहणाऱ्यांना हे अपंग मित्र डोळ्यात अंजन घालून जातात. सुदृढ समाज, लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्या आयुष्याच्या सकारात्मक जीवनाला आधार देण्यास पुढे यावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youths Overcome Their Disability And Created A Special Identity In The Society