युतीची वाढलेली मते राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची

उमेश बांबरे
शनिवार, 25 मे 2019

भाजपने निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात केलेली संघटनात्मक बांधणी साताऱ्यातील युतीच्या उमेदवाराच्या  मताधिक्‍यात वाढ करण्यास महत्त्वपूर्ण ठरली आहे. सर्वांनी संघटितपणे काम केल्याने विरोधी उमेदवाराशी नरेंद्र पाटील यांनी चांगली लढत दिली. आता विधानसभेला हाच ‘ट्रेंड’ कायम ठेवत सर्व मतदारसंघांत पुन्हा ताकदीने उतरून परिवर्तनाची लढाई जिल्ह्यात लढणार आहोत. 
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप, सातारा

सातारा - लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला १९९६ च्या निकालाची पुनरावृत्ती करायची होती; पण ती थोड्या फरकाने हुकली. परिवर्तनाच्या प्रयत्नात त्यांच्या उमेदवाराला मिळालेली साडेचार लाख मते 
ही सेना- भाजप युतीची आगामी विधानसभेची बांधणी आहे. पाटणला १८ हजार, तर कऱ्हाड दक्षिणेत चार हजार ८२८ मतांची श्री. पाटील यांना मिळालेली आघाडी विधानसभेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इतर मतदारसंघांतही नरेंद्र पाटील यांना ६५ ते ८० हजारांच्या दरम्यान मते मिळाली आहेत. शिवसेना व भाजपची वाढलेली मते आगामी काळात राष्ट्रवादीला धोक्‍याची घंटा आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळेस कमी उमेदवार रिंगणात होते. प्रत्यक्ष लढत ही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांतच झाली. उदयनराजेंविषयी पक्ष व पक्षाच्या नेत्यांत असलेल्या नाराजीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न झाला; पण ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांच्या शब्दाखातर उदयनराजेंना साथ दिली. 

हे सर्व होत असताना नवखे असूनही शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंशी ताकदीने झुंज दिली. त्यांच्या विजयासाठी भाजप, शिवसेनेसोबतच परिवर्तनाच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनीही जीव ओतून काम केले. मुळात शिवसेनेची ताकद जिल्ह्यात मर्यादित होती. १९९६ मध्ये हिंदूराव नाईक- निंबाळकर हे काँग्रेसचे प्रतापराव भोसले यांच्याविरोधात ११ हजार ८०९ मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी हिंदूराव नाईक- निंबाळकर यांना एक लाख ९० हजार ५२६ मते मिळाली होती. तर प्रतापराव भोसले यांना एक लाख ७८ हजार ७१७ मते मिळाली होती. त्यानंतर २००९ पर्यंत शिवसेनेचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होता. 

प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांची मते अडीच लाखांपर्यंत पोचली होती. मात्र, यावेळेस त्यात वाढ होऊन साडेचार लाखांवर पोचली आहेत. ही सेना-भाजप युतीची एकत्रित मते आहेत. त्यामुळे ही वाढलेली मते आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीसाठीची ही बांधणी आहे. 

विधानसभेसाठी शिवसेना- भाजपची युती कायम राहिल्यास कऱ्हाड दक्षिण आणि पाटणमध्ये त्यांना निवडणूक सोपी होईल. तसेच इतर मतदारसंघातही उदयनराजेंपेक्षा ३० ते ४० हजारांच्या फरकाने नरेंद्र पाटील यांना मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेना- भाजप युतीची ताकद जिल्ह्यात वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

आगामी निवडणुकीत ही वाढलेली ताकद राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धक्का देणारी ठरू शकते. त्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना व भाजपने जिल्ह्यात बांधणी केली होती. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही करायला हवी, तसेच गावागावांतील संपर्क अभियानही कायम ठेवला पाहिजे, तरच बालेकिल्ल्याला सुरूंग लागेल, असे जाणकार बोलून दाखवत आहेत.

शिवसेनेचा जिल्ह्यात प्रभाव वाढत असून, निवडणुकीपूर्वी घराघरांत धनुष्यबाण चिन्ह आणि केलेल्या विकासकामांची माहिती आम्ही पोचवू शकलो. आमच्या उमेदवाराच्या मतांमध्ये दोन लाखांनी वाढ झाली आहे. ही वाढ कायम ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भगवा फडकविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभेची निवडणूक शिवसेनेसाठी रंगीत तालीम होती. आता आमच्याकडून काही उणिवा राहिल्या असतील, तर त्या आम्ही शोधून दुरुस्त करणार आहोत.
- प्रा. नितीन बानुगडे- पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuti Loksabha Voting NCP Danger Politics