सोलापूर: गायब झालेत झेब्रा क्रॉसिंग! 

परशुराम कोकणे 
मंगळवार, 29 मे 2018

वाहतुकीला शिस्त रहावी म्हणून, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा म्हणून चौकाचौकांत झेब्रा क्रॉसिंग आवश्‍यक आहेत. वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय आम्ही अनेकदा मांडला आहे; पण महापालिकेकडे निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते. 
- सुनील दावडा, सदस्य, शहर पोलिस वाहतूक सल्लागार समिती

सोलापूर : पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्‍यक असलेले झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे शहरातून गायब झाले आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वच सिग्लन चौकात झेब्रा क्रॉसिंग आवश्‍यक आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेला वारंवार पाठपुरावा करूनही पैशाची अडचण सांगून दुर्लक्ष केले जात आहे. 

सर्वच चौकात पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक चौकातील पांढरे पट्टे गायब झाले आहेत. सहा महिने, वर्षभराने पांढरे पट्टे पुन्हा रंगविणे आवश्‍यक असते. काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे, खोदाईचे काम करण्यात आले; नंतर मात्र पांढरे पट्टे मारलेच नाहीत. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरून जागा दिली पाहिजे हे बहुतांश वाहनचालकांना माहीत नाही. पांढरे पट्टे दिसत नसल्याने वाहनचालक सिग्नलच्या पुढे जाऊन थांबत आहेत. बेशिस्तपणे कोणी कोठेही थांबत आहेत. पट्टे दिसत नसल्याने पोलिसही वाहनधारकांवर कारवाई करू शकत नाहीत. महापालिकेच्या संबंधित विभागाला पोलिस आयुक्तालयाच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पत्रव्यवहार केला आहे. निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत झेब्रा क्रॉसिंगच्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

महापालिकेने तरतूद करावी... 
झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल व्यवस्था यासह वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. प्रत्येक वेळी निधी नसल्याचे कारण देणे योग्य नाही. शहर स्मार्ट करायचे असेल तर याकडे लक्ष दिलेच पाहिजे. अर्थसंकल्पात या विषयाकरिता निधीची तरतूद करणे आवश्‍यक आहे. 

चौकाचौकांत झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे करून मिळावेत यासाठी महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे. पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालक सिग्नलच्या पुढे जाऊन थांबतात. पादचाऱ्यांना रस्ताच मिळत नाही. महापालिका प्रशासनाने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
- संतोष काणे, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा 

वाहतुकीला शिस्त रहावी म्हणून, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा म्हणून चौकाचौकांत झेब्रा क्रॉसिंग आवश्‍यक आहेत. वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय आम्ही अनेकदा मांडला आहे; पण महापालिकेकडे निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते. 
- सुनील दावडा, सदस्य, शहर पोलिस वाहतूक सल्लागार समिती

Web Title: zebra crossing in Solapur