Vidhan Sabha 2019 सातारा जिल्ह्यात ' येथे ' झाले शून्य टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

माण विधानसभा मतदार संघातील म्हसवड येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील मतदान केंद्रात सर्व खोल्यांमध्ये मतदानास मतदारांची उंचांकी संख्या होती. यामुळे सांयकाळी सहानंतर देखील मतदान प्रक्रिया सुरु होती. 

कोयनानगर : सातारा जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. पावसाच्या उघडीपीमुळे कोयना विभागात चुरशीने मतदान झाले. कोयना विभागातील अनेक मतदान केंद्रावर रांगा लावून मतदारानी आपले कर्तव्य बजावले. कोयना विभागातील मळे , कोळने , पाथरपुंज या तीन गावातील मतदारांनी आपल्या न्याय मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. यामुळे येथे मतदान झालेच नाही.

कोयना विभागातील कामरगाव , रासाटी , नवजा , कोयनानगर , गोवारे , हुंबरळी , देशमुखवाडी , हेळवाक , भराडवाडी येथे चांगले मतदान झाले. मळे , कोळने , पाथरपुंज या चांदोली अभयारण्यात येणाऱ्या या गावांनी आपल्या प्रलंबित राहिलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर ठाम राहिल्याने या मतदान केंद्रावर अखेर पर्यंत शुकशुकाट होता.

याबाबत या तीन गावातील ग्रामस्थांनी माहिती दिली. आमच्यावर आजपर्यंत सत्तेवर असलेल्या सर्वच शासनाने अन्याय केला आहे. युती शासनाने आमच्या प्रश्नावर तोडगा काढला असला तरी घेतलेला निर्णय जाहीर न केल्यामुळे आम्ही आजही या ठिकाणी खितपत पडून आहोत. सन 1894 मध्ये चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली आहे. सन 2004 मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा देण्यात आल्यानंतर या तीन गावातील अनेक गोष्टीवर बंदी आली आहे.

कोयना अभयारण्य व चांदोली अभयारण्य मिळून शासनाने सह्याद्री व्याघ्रप्रकल्प निर्माण केला आहे. यामुळे तिन्ही गावातील जनता विकासापासून कोसो दूर होवून मागास राहिल्याने तसेच मागण्या मान्य न झाल्याने मतदानावर बहिष्कार टाकल्याचे प्रकाश चाळके , संजय पवार , रवी डांगरे , शिवाजी चाळके , अंकुश पवार , पांडुरंग डांगरे आदी ग्रामस्थांनी नमूद केले. 

माणमध्ये सहानंतर मतदान सुरुच 

माण विधानसभा मतदार संघातील म्हसवड येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील मतदान केंद्रात सर्व खोल्यांमध्ये मतदानास मतदारांची उंचांकी संख्या होती. यामुळे सांयकाळी सहानंतर देखील मतदान प्रक्रिया सुरु होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'zero' voting took place in Satara district one votin center