मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

- सुहास शिंदे
रविवार, 22 जानेवारी 2017

राष्ट्रवादीला गटबाजी, तर काँग्रेसला भाजपची मुसंडी ठरणार डोकेदुखी 
पुसेसावळी - सातारा जिल्हा परिषदेच्या पुसेसावळी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजी, तर काँग्रेसला भाजपची मुसंडी डोकेदुखी ठरणार असून, मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीला गटबाजी, तर काँग्रेसला भाजपची मुसंडी ठरणार डोकेदुखी 
पुसेसावळी - सातारा जिल्हा परिषदेच्या पुसेसावळी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजी, तर काँग्रेसला भाजपची मुसंडी डोकेदुखी ठरणार असून, मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे दिसून येत आहे.

पुसेसावळी गटासह गटातील दोन्ही जागा या सर्वसाधारण महिला राखीव असल्याने ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष जितेंद्र पवार यांनी स्वतःच्या पत्नीसाठी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितली आहे, तद्वत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे याही इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा बोलबाला नसून अंतर्गत हालचालींना मात्र वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत याही लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, त्यांचे नाव सध्या पिछाडीवर पडल्याचे बोलले जात आहे. 

‘राष्ट्रवादी’चे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव माळवे यांचे पुतणे अमोल माळवे यांच्या पत्नी अश्विनी माळवे यांनी मुलाखत देऊन एक प्रकारे ‘राष्ट्रवादी’अंतर्गत गटबाजीचे दर्शन घडवून दिले आहे. काँग्रेसमधून जिल्हा परिषदेसाठी धैर्यशील कदम यांच्या पत्नी आणि खटाव पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता कदम यांचे नाव आघाडीवर असले, तरी सर्वसामान्यांतील उमेदवार निवडून आणण्याचीही तयारी या गटाचे नेते धैर्यशील कदम यांची असल्याचे बोलले जात आहे. भाजपमधून वांझोळीतील सुप्रिया मगर, तसेच रुक्‍मिणी पिसाळ व प्रियांका माळवेही इच्छुक आहेत. 

पुसेसावळी गणामधून ‘राष्ट्रवादी’तून माजी उपसभापती चंद्रकांत कदम यांच्या घरातील उमेदवारी पक्की असल्याचे बोलले जात असून, भाजपमधून तेजस्वी आळसुंदकर यांचे नाव पुढे येत आहे. येथे काँग्रेसनेही उमेदवार शोधण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसमधून पुसेसावळीच्या माजी सरपंच उषाताई कदम अथवा पारगावचे माजी सरपंच विजय पवार यांच्या घरातील उमेदवार निघू शकतो. त्याबरोबर उंचीठाणेच्या सरपंच शुभांगी शिंदे अथवा ऐन वेळी एखाद्या नवख्या उमेदवाराची घोषणा काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम करू शकतात. 

म्हासुर्णे गणात या वेळी चांगलीच रस्सीखेच असून, ‘राष्ट्रवादी’मधून वडगाव येथील रेखा घार्गे व म्हसुर्णेच्या प्रियांका माने व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस तुषार माने हेही आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ‘राष्ट्रवादी’मधून उमेदवारी न मिळाल्यास यांच्यातील काही इच्छुक बंडाच्या पवित्र्यात आहेत. काँग्रेसमधून वडगावचे महेश घार्गे, राहटणीचे संजय थोरात, म्हासुर्णेचे पोपट माने यांच्यातील एखाद्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. भाजपमधून सुनीता मगर यांनी मुलाखत दिली असून, त्यांची सध्याची भूमिका डळमळीत मानली जात आहे. एकंदरीतच म्हासुर्णे गणामधे चांगली लढत होणार असून, मतांच्या गोळाबेरजेसाठी निरनिराळ्या चाली सर्वच पक्षांमधून होऊ शकतात. त्याचबरोबर म्हासुर्णेच्या मतांची संख्या लक्षात घेता या वेळी सर्वच पक्षातील नेत्यांचे लक्ष म्हासुर्णे गावावर राहणार असल्याचे दिसून येत आहे.

‘राष्ट्रवादी’अंतर्गत वेगळी समीकरणे घडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच झाल्या असता त्यात पुसेसावळी गटातून काही मोजक्‍या इच्छुकांनी मुलाखती दिल्यामुळे ‘राष्ट्रवादी’अंतर्गत गोटात वेगळी समीकरणे घडणार असल्याच्या चर्चेने परिसरात उधाण आले आहे.

Web Title: zilla parishad election