जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यकाने 'यासाठी' घेतली लाच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

प्रलंबीत फाईल तयार करून ती वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी वरीष्ठ सहायक गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे याने दहा हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार पाचशे रुपये घेण्याचे ठरले.

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ सहायक गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे (वय 47) यास आठ हजार पाचशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी अटक केली. कनिष्ठ लिपीक पदाची वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी ही लाच घेतली आहे.

हेही वाचा : पुणे पदवीधरचे 25 हजार अर्ज नामंजूर 

दहा हजारांची लाच मागितली
तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पदास मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागात प्रलंबीत होता. प्रलंबीत फाईल तयार करून ती वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी वाघमारे याने दहा हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार पाचशे रुपये घेण्याचे ठरले. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत सापळा लावण्यात आला.

हेही वाचा : बापरे.. 'यामुळे' त्याने कापून घेतले गुप्तांग!

जिन्यामध्ये लाच स्वीकारली
कार्यालयाचे वरच्या मजल्यावर जातानाचे जिन्यामध्ये वाघमारे याने आठ हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहायक फौजदार निलकंठ जाधवर, पोलिस नाईक अर्चना स्वामी, पोलिस शिपाई सिध्दराम देशमुख, संतोष वाघमारे, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad employee took bribe