‘दक्षिण’मध्ये काँग्रेससोबतच - हसन मुश्रीफ

‘दक्षिण’मध्ये काँग्रेससोबतच - हसन मुश्रीफ

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसविरोधी मोट बांधण्यात येणार असल्याचे सांगून चोवीस तास उलटण्याच्या अगोदरच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेससोबतच राष्ट्रवादी राहील, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी पक्ष निरीक्षक दिलीप पाटील यांनी जातीयवादी पक्षांना वगळून स्थानिक पातळीवर आघाडी करण्यास प्रदेशने मान्यता दिली असली तरी आघाडीतून निवडणूक लढवताना पक्षाचे चिन्ह वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज संपला. दोन दिवसांत अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आज सहा जिल्ह्यांतील ४१ जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी १३७ जणांनी, तर पंचायत समितीच्या ८२ जागांसाठी २१४ जणांनी मुलाखती दिल्या. जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी एकूण ६६५ कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. दोन दिवसांत अर्जांची छाननी करण्यात येईल.

त्यानंतर हा अहवाल प्रदेशकडे पाठविला जाईल. २६ किंवा २७ जानेवारीला राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. काल झालेल्या सहा तालुक्‍यांतील मुलाखतींमध्ये काही ठिकाणी आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी तालुक्‍यांत स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबाबत आज चर्चा झाली. विशेषत: शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यांत राजेंद्र पाटील-यड्रावकर आघाडी करत आहेत. या आघाड्यांबाबत स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा केली जाईल.’’ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबाबत विचारले असता श्री.  मुश्रीफ म्हणाले, 

‘काल खासदारांनी जे वक्‍तव्य केले, त्याला त्यांनी परवानगी आणली आहे की नाही, हे आपणास माहीत नाही. दक्षिण मतदारसंघात काँग्रेससोबतच राष्ट्रवादी राहील. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार आपण करणार आहोत. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच जिल्हा परिषदेवर झेंडा फडकेल.’’

निरीक्षक दिलीप पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणीस चांगला प्रतिसाद आहे. कालपासून आघाड्यांसंदर्भात या ठिकाणी होत असलेली चर्चा आपण ऐकत आहे. स्थानिक पातळीवरील अडचणी लक्षात घेता प्रदेश समितीने आघाड्या करण्याबाबत स्थानिक नेत्यांना काही अधिकार दिले आहेत, मात्र आघाडी करत असतानाही काही पथ्ये पाळावी लागतील. जातीयवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करणार नाही.

ज्या ठिकाणी अशी आघाडी होईल, त्याला प्रदेशकडून मान्यता घ्यावी लागेल. काँग्रेस, भाजप, शिवसेनेमधील कार्यकर्त्यांशी आघाडी झाली असेल, तर त्याठिकाणी पक्षाचे घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही. त्याठिकाणी आघाडीचे चिन्ह वापरावे. समविचार पक्षांशी आघाडी ज्या ठिकाणी झाली असेल, त्याठिकाणी पक्षाचे चिन्ह वापरण्यास काही हरकत नाही.’’  

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अनिल साळोखे, मानसिंग चव्हाण, भैया माने, प्रा. एस. डी. पाटील आदी उपस्थित होते.

यांनी मागितली उमेदवारी
आज उमेदवारी मागितलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या पत्नी उषा, सदस्य धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू रणवीरसिंह आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com