‘राष्ट्रवादी’चा झेंडा फडकवू

‘राष्ट्रवादी’चा झेंडा फडकवू

तब्बल ३५ वर्षांच्या सत्तेच्या माध्यमातून तालुका विकासाच्या प्रवाहात आणला आहे. सहकारी संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे तालुक्‍यात असल्याने या वेळी चिठ्ठीचा खेळ संपवून संपूर्ण बहुमतात पंचायत समितीवर ‘राष्ट्रवादी’चा झेंडा फडकविण्यासाठी तयारी झाली आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या २१ जागांसाठी पक्षाकडे उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी ३५ वर्षांच्या सत्तेच्या काळात विकासाची गंगा पोचविली आहे. रस्ते, नळ पाणीपुरवठा योजना, शाळा खोल्या, वीज, आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी तालुक्‍यात आणला आहे. सहकारी संस्थांची नेत्रदीपक प्रगती, सकस, कोयना ॲग्रो, पवनउर्जा, कोयना पर्यटन यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍याला विकास म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे पक्षाची प्रत्येक विभागात मोठी ताकद असून, या ताकदीच्या जोरावर पंचायत समितीतील चिठ्ठीचा खेळ संपविण्यासाठी आम्ही तयार आहोत. युवक नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी विधानसभेतील पराभवाने खचून न जाता शेती उत्पन्न बाजार समिती व नगरपंचायतीची पहिली निवडणूक सहज जिंकली आहे.

सक्षम कार्यकर्ते व रोजगार निर्मितीचे प्रकल्प राबविल्याने पक्षाचे पाठबळ वाढले आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी ‘राष्ट्रवादी’तच पाहावयास मिळते.
 - राजाभाऊ काळे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

भगवा फडकविण्यास सज्ज
पाटण तालुक्‍यात देसाई गट अथवा विकास आघाडी असा कोणताही विषय नसून आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांच्या निवडणुका शिवसेनेच्या धनुष्य बाणावर लढवून पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहेत. मागील निवडणुका पाटण तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या, तरी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे धनुष्य बाणाच्याचिन्हावर लढविण्यात येणार आहे. शंभूराज देसाई, 
जिल्हा शिवसेनाप्रमुख हर्षल कदम, उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पक्षाचे पदाधिकारी व साखर कारखान्याचे संचालक मंडळ या निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाण्यासाठी कार्यरत आहेत. निवडणुकीत पक्ष मजबूत स्थितीमध्ये असल्याने इच्छुक उमेदवारांची गर्दी शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. हा सर्व विचार करता देसाई गट अथवा विकास आघाडीचा विषय येत नसून शिवसेना स्वबळावर लढण्यास सिद्ध असल्याचे वातावरण आहे. शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हावर पंचायत समितीचे १४ गण व जिल्हा परिषदेचे सात गट स्वबळावर लढवून पाटण पंचायत समितीवर बहुमताने शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक तयार झाला आहे.

पाटण तालुक्‍यात केलेली विकासकामे व आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व शिवसेनेला पंचायत समितीत सत्ता सहज मिळवून देईल, असा आम्हाला विश्‍वास आहे.
 - रवी पाटील, तालुकाप्रमुख, शिवसेना

काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न 

अनेक वर्षे राज्य व देशात सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष संक्रमणाच्या कालावधीत तालुक्‍यात अस्तित्व टिकवून राहिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडी शासनाच्या काळात कोट्यवधींची विकासकामे झाली. त्यामुळे प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले असून, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व २१ जागा स्वबळावर लढविण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

निवडणुका लागल्या, की तालुक्‍यात आगमन करून पैशाच्या जिवावर सामान्य जनतेला क्षणिक प्रलोभने दाखवून राजकारण करण्याचा काही जणांचा चाललेला अजब फंडा या निवडणुकीत आम्ही हाणून पाडण्यासाठी तयारी केली आहे. सामान्य कार्यकर्ता आमचे पाठबळ आहे. उमेदवार कोण यापेक्षा पक्ष देईल तोच शिलेदार ही पक्षाची रणनीती असून, प्रस्थापितांना धडा शिकविण्याची ही वेळ असल्याने कार्यकर्ते जागरूक आहेत. पृथ्वीराज बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडी शासनाच्या काळात गावागावांत विकासाची गंगा पोचविली आहे. पृथ्वीराज चव्हाण व आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला तालुक्‍यात हिंदुराव पाटील यांचे नेतृत्व निश्‍चित गतवैभव प्राप्त करून देईल.

भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे अशक्‍य झाले आहे. त्यामुळे मोदी शासनाच्या विरोधात असंतोष असून, त्याचा फायदा पक्षाला होणार आहे.
- आर. बी. पाटील, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

गटबाजीमुळे विकास खुंटला

पाटण तालुक्‍यात असणारी गटबाजी मोडीत काढून पक्षीय राजकारण वाढीस लावण्यासाठी भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पाटण तालुक्‍यातील सात गट आणि १४ पंचायत समिती गण स्वबळावर लढविणार आहे. प्रथमच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवीत असून, धक्कादायक निकाल जनता देईल. सक्षम पर्याय नसल्याने कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. प्रस्थापित नेत्यांकडून होणारी गळचेपी थांबविण्यासाठी कार्यकर्त्यांना भाजपचा पर्याय निर्माण झाल्याने दोन्ही गटांतील कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. गटबाजीच्या राजकारणामुळे तालुक्‍याचा विकास खुंटला आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांप्रमाणे अनेक समस्या तालुक्‍यासमोर आहेत. धरणांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे कालव्यांचे प्रश्न रखडलेले आहेत. याचा परिणाम पाणी असूनही शेती ओलिताखाली येत नाही. पक्षात असूनही गटाचे राजकारण करणारी नेतेमंडळी पत्रकबाजीतून तालुक्‍याची शोभा वाढवीत आहेत. आरोप- प्रत्यारोप करून स्वतःचे कर्तत्व लपविण्याचा यांचा धंदा बंद करण्यासाठी ही निवडणूक जनतेला एक संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना जनतेच्या हितासाठी राबविल्या आहेत. माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्‍यात भाजपचा जोर वाढला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २१ जागा स्वबळावर लढून तालुक्‍याला विकासाभिमुख करताना पंचायत समितीवर पक्षाचा झेंडा फडकविण्यास आमचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
- कमलाकर पाटील, तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com