सावित्रींच्या जिल्ह्यातील ‘खोटारडे’ शिक्षक बिनधास्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया चालू शैक्षणिक वर्षात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने राबविली. मात्र या प्रक्रियेत जिल्ह्यातील ३७ शिक्षकांनी प्रशासनाच्या हातावर तुरी देण्याचा प्रकार केला. विभागीय आयुक्‍त स्तरावर सुनावणी होऊन सहा महिन्यांनंतरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जिल्ह्यात असे ‘खोटारडे’ शिक्षक बिनधास्त राहत आहेत.

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया चालू शैक्षणिक वर्षात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने राबविली. मात्र या प्रक्रियेत जिल्ह्यातील ३७ शिक्षकांनी प्रशासनाच्या हातावर तुरी देण्याचा प्रकार केला. विभागीय आयुक्‍त स्तरावर सुनावणी होऊन सहा महिन्यांनंतरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जिल्ह्यात असे ‘खोटारडे’ शिक्षक बिनधास्त राहत आहेत.

ग्रामविकास विभागाने राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बदली प्रक्रिया राबविली. त्यासाठी शिक्षकांनी स्वत: ऑनलाइन माहिती भरली होती. शिक्षकांच्या प्रामाणिकतेवर विश्‍वास ठेवूनच जणूकाही ग्रामविकास विभागाचे तत्कालीन सचिव असिम गुप्ता यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र त्या विश्‍वासार्हतेचा लाभ उठविण्याचे काम राज्यभरातील शेकडो शिक्षकांनी केले. तसेच सातारा जिल्ह्यातील ३७ शिक्षकांनीही असाच बोगस दाखले देऊन फायदा उठविला आहे. इतर जिल्ह्यांतील अशा बोगस माहिती, कागदपत्रे देणाऱ्यांवर कारवाई करण्यात  आल्याचे शिक्षक सांगत आहेत.

जिल्ह्यातील अशा खोटारड्या शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी जुलैमध्ये विभागीय आयुक्‍त स्तरावर सुनावणी घेण्यात आली होती. त्यामध्ये अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र दिले म्हणून १८ जणांची कागदपत्रे तपासावीत, पती-पत्नी यांच्या नोकरीच्या अथवा शाळेच्या ठिकाणांतील अंतर ३० किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचे १७ शिक्षकांनी दाखविले, नऊ शिक्षकांनी पती अथवा पत्नी कायमस्वरूपी नोकरीत असल्याची प्रमाणपत्रे जोडली, तर चार शिक्षकांनी दुर्गम भागात काम केल्याचे भासवून बदलीपात्र संवर्गाचा लाभ घेतला. या शिक्षकांची इनकॅमेरा सुनावणी झाल्यावर त्यांना नोटीस देण्याचा खेळही सामान्य प्रशासन व शिक्षण विभागाने खेळला. नोव्हेंबरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित शिक्षकांवर फौजदारी दाखल करण्याचे सूतोवाचही केले होते. मात्र, आता २०१९ सुरू झाले तरीही अशा ‘खोटारड्या’ शिक्षकांवर कारवाई का होत नाही, अशी विचारणा शिक्षकांतून होत आहे.

शिक्षकांचा असा खोटेपणा...
दिव्यांग नसतानाही दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडणे
पाल्य दिव्यांग नसतानाही दिव्यांग असल्याचे दाखविणे
दोघांतील अंतर ३० किमी. असल्याचा दाखला जोडणे
जोडीदार कायमस्वरूपी नोकरीला असल्याचे दाखविणे
दुर्गम शाळेत काम न करता या संवर्गाचा लाभ घेणे
आंतरजिल्हा बदलीने येऊनही बदलीचा लाभ घेणे.

Web Title: Zilla Parishad primary teachers have implemented the transfer process online