उत्साहात रंगला झिम्मा-फुगडीचा फेर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

 श्रावण उत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; बहारदार गीतांमुळे कार्यक्रमात रंगत

सातारा ः पारंपरिक नऊवारीच्या ठसक्‍यात झिम्मा-फुगडीसह नृत्यातून सुंदर गोफ विणत आणि लढणाऱ्या महिलेचे दर्शन घडवत जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी समर्थ मंदिरनजीकच्या प्रथमेश दर्शन अपार्टमेंटच्या आवारात झालेल्या श्रावण उत्सव कार्यक्रमात रंग भरला. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
"सकाळ 'आणि प्रथमेश रिऍलिटी यांच्या वतीने येथे मंगळागौरीचे खेळ आणि पारंपरिक गीतांचा कार्यक्रम आयोजिला होता. त्याचे उद्‌घाटन प्रथमेश रिऍलिटीचे विवेक निकम, जितेंद्र भोसले व जागृती मंडळाच्या अध्यक्षा वैशाली फडणीस, माजी नगरसेविका भणगे उपस्थित होत्या. या वेळी मंगळागौरीसह महिलांच्या सणांतील पारंपरिक नृत्ये, खेळ, फेर आणि गीते जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी बहारदारपणे सादर केली. हिरव्या आणि इतर रंगातील पारंपरिक नऊवारी साड्या परिधान केलेल्या मंडळाच्या महिलांनी समुद्रात हेलकावणारी होडी, काटवटकणा, सुपल्यांचा खेळ, घागर 
फुंकणे, लाटण्याचा खेळ असे विविध प्रकार सादर करताना त्याला संगीतासह पारंपरिक गीतांची जोड देण्यात दिली. गोफ, अडवळ घूम, पडवळ घूम, हट घोड्या हट, काचकिरडा, किकीचं पान, सासुरवासींनीचे मनोवेध घेणारे गीत, सासऱ्याचा कासरा, भोर भेंडी, कोंबडा, फुगड्यांचे असंख्य आणि अवघड प्रकार, झिम्म्याचे विविध प्रकार, ताक घुसळण, घागर फुंकणे, उखाणे, पारंपरिक गीते अशा अनेक खेळांनी जागृती महिला मंडळ सदस्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवले. पारंपरिक गीतांच्या मराठी ठसक्‍याला मिळालेली महिलांच्या पदन्यासाची जोड यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. या वेळी नव्याने विवाहित झालेल्या महिलांना उखाणे घेण्याची संधी देण्यात आली. त्यांनी घेतलेले उखाणे धमाल उडवून गेले. 
पारंपरिक मंगळागौर सादर करत असतानाच आधुनिक नारीची लढण्याची हत्यारे लाटणं, स्मार्ट फोन, लॅपटॉप, मुलांची दप्तरेही देत आजच्या स्त्रीचं दर्शन घडविले. याला उपस्थित महिलांनी मनमुराद दाद दिली. 
फुगड्यांमध्ये छोटी कलाकार निहारिका भिडे हिने फुलपाखरू फुगडी खेळत उपस्थितांची दाद मिळविली. 
खेळात रागिणी जोशी, ऋता कुलकर्णी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी पारंपरिक गीतांतून सुप्रिया भिडे, वैशाली फडणीस आणि समर्पक अशा निवेदनातून वैदेही कुलकर्णी यांनी रंगत आणली. निवेदिका चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश रिऍलिटीचे विवेक निकम, जितेंद्र भोसले व जागृती मंडळाच्या अध्यक्षा वैशाली फडणीस यांचे स्वागत "सकाळ'चे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी केले. सहायक व्यवस्थापक राहुल पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zimma -pulp tour in color with enthusiasm