अध्यक्ष भाजपचाच - खासदार संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

सांगली - जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार यामध्ये कुठलीही अडचण नाही. रयत विकास आघाडी आणि शिवसेनेशी यापूर्वीच चर्चा झालेली आहे. अध्यक्ष निवडीच्या हालचाली पंचायत समिती सभापती निवडीनंतर होतील, अशी माहिती भाजपचे नेते खासदार संजय पाटील यांनी दिली.

सांगलीत पत्रकारांशी बोलताना खासदार पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद निकालादिवशीच शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा झाली आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेही त्यांच्याशी बोलले आहेत. त्यामुळे कुठली अडचण येईल, असे वाटत नाही. याबाबत अधिकृत माहिती आमदार बाबर देतील. तसेच रयत विकास आघाडीच्या नेत्यांशीही बोलणे झाले आहे. त्यांचाही पाठिंबा मिळेल.’’

ते म्हणाले, ‘‘मंगळवारी (ता. १४) पंचायत समिती सभापतींच्या निवडी आहेत. जत आणि मिरजेत भाजपला काठावरच्या जागा मिळाल्या आहेत. तेथे अपक्षांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपचे सभापती होतील. पलूस, कडेगाव आणि आटपाडीत पूर्ण बहुमत असल्याने तेथेही भाजपचा सभापती होईल.’’

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या हालचाली सभापती निवडीनंतर सुरू होतील. सभापती निवडीनंतर एका आठवड्याने अध्यक्ष निवड होणार आहे. त्यामुळे मध्ये काही वेळ मिळणार असल्याने त्यात अध्यक्ष ठरवला जाईल, असे खासदार पाटील म्हणाले.

Web Title: zp chairman bjp