सत्तेपासून दूर ठेवण्याच्या खेळ्या भाजपने उधळल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

काँग्रेस-राष्ट्रवादी अखेर कट्ट्यावरच - लाल दिवा कडेपूरकडे सुसाट

काँग्रेस-राष्ट्रवादी अखेर कट्ट्यावरच - लाल दिवा कडेपूरकडे सुसाट

ज्या जिल्ह्यात स्थापनेपासून (१९६२) काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असा इतिहास होता, त्याला संग्रामसिंह देशमुख यांनी धक्‍का देत भाजपकडून पहिला अध्यक्ष म्हणून आपले नाव नोंदवत नवा इतिहास घडविला. त्यामुळे भाजप आणि देशमुखांना बाजूला पाडण्यासाठी पतंगराव व मोहनरावांनी जयंतरावांना जोडीला घेऊन ज्या खेळ्या केल्या, त्या पूर्णपणे फसल्या. विशेष म्हणजे राज्यात शिवसेना आणि भाजपचे फाटले असताना आमदार अनिल बाबर यांनी मात्र भाजपला साथ देत सुहास बाबर यांना उपाध्यक्ष पदावर विराजमान करून शिवसेनेला पहिल्यांदाच एवढे मोठे पद मिळवून दिले. चार आमदार आणि एक खासदार असलेल्या भाजपकडे २५ सदस्य असतानाही राजू शेट्टींनी विरोधी सूर आळवला, पण नंतर तो मावळला. अर्थात पडद्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादी यांना एकत्र आणत भाजपला सत्तेपासून दूर करण्याच्या सर्व खेळी मोडीत निघाल्या.

- विष्णू मोहिते

जिल्हा परिषद स्थापनेपासून भाजपच्या चिन्हावर एकही सदस्य निवडून आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजप ‘झिरो टू हिरो’ ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी येथील भाजप सरदारांना झेडपीवर कमळ फुलवा, मगच मंत्रिपदाचे बघू, असे टार्गेट दिले होते. सरदारांनी पतंगराव कदम आणि जयंतराव पाटील या दिग्गजांना टक्‍कर देत हे टार्गेट पूर्ण केले. लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर जिंकली, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना विधानसभा, महापालिका, नगरपालिका आणि त्यानंतर झेडपीतील विजयांमुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या कक्षा विस्तारून जोरदार धडक दिली, असे म्हणावे लागेल.

भाजपने दिल्ली ते गल्ली असा सुरू केलेल्या विस्तारामुळे ग्रामीण भागातील चेहरा म्हणून आता पक्ष पुढे येतो आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि सर्वांना बरोबर घेऊन केलेल्या आखणीमुळेच भाजप ग्रामीण भागात विस्तारला. ग्रामीण भागातील भाजपची व्होट बॅंकच निवडणुकीच्या निमित्ताने तयार करण्यात नेत्यांना यश आले.  

सांगली झेडपी निवडणुकीत आघाडीतील नाराजांना आपलेसे करण्यात त्यांना यश मिळाले. यामुळे राष्ट्रवादीसमोर सर्वाधिक अडचणीत आल्या. भाजपवर ‘जेजेपी’चा शिक्का पुसण्यास अखेर यश आले. आटपाडी तालुक्‍यात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख ऐन वेळी भाजपात आले. त्यामुळे संपूर्ण तालुका भाजपमय झाला. 

जिल्ह्यातील १० पंचायत समितीत्यातील पलूस, कडेगाव, मिरज, जत, आटपाडी अशा ५ पंचायत समितीवर यापूर्वीच कमळ फुलले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अथक प्रयत्न आणि पलूस, कडेगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीशी आघाडी केल्यामुळे दोन तालुक्‍यातील ८ झेडपी सदस्यांपैकी ७ जागांवर विजय मिळाला. जत तालुक्‍यात आमदार विलासराव जगताप यांनी आपला गड राखला. वाळवा तालुक्‍यातील राष्ट्रवादी विरोधातील ताकद एकवटण्यात पणन मंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, नाना महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, सी. बी. पाटील, वैभव नायकवडी यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले. चार झेडपी सदस्य निवडून आले. त्याचमुळे भाजप सत्तेच्या जवळपास पोहोचली. 

असे रंगले सत्तानाट्य
जिल्हा परिषदेची सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. शिवसेना, रयत विकास आघाडी सत्ता स्थापण्यासाठी किंगमेकर ठरले. पणन मंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री सुभाष देशमुख सोमवारी दिवसभर जिल्ह्यात तळ ठोकून होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशामुळे संग्रामसिंह देशमुख यांना अध्यक्षपद देण्याचा मार्ग सुकर झाला.  

मिनी मंत्रालयात सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपमध्ये अध्यक्षपदावरून चढाओढ सुरू होती. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधून सांगलीत तळ ठोकला होता. पक्षातील सर्व नेत्यांची एक बैठक घेतली. अध्यक्षपदासाठी संग्रामसिंह देशमुख, डी. के. पाटील आणि शिवाजी डोंगरे यांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये देशमुख आघाडीवर होते. खासदार संजय पाटील गटाने डी. के. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पालकमंत्री देशमुख यांनी संग्रामसिंह यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले. यामुळे खासदार गट नाराज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खासदार पाटील यांची समजूत काढली. त्यानंतर संजयकाकांनी संग्रामसिंह यांना हिरवा कंदील दर्शविला. 

अध्यक्षपदासाठी सकाळी अकरा ते बारा या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले होते. त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले शिवाजी डोंगरे यांनीही अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पावणेबाराच्या सुमारास भाजपचे सदस्य शिवाजी डोंगरे आणि त्यांच्या पत्नी विद्या डोंगरे अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. त्यांनी अर्जाची पूर्तताही केली. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासदार संजय पाटील यांना फोन आला. पक्षाकडून देशमुख यांचा एकमेव अर्ज राहिला पाहिजे, असे सांगितल्याने खासदार पाटील यांनी डोंगरे यांच्यासाठी फिल्डिंग लावली. 

खासदार संजयकाकांनी मोबाईलवरून डोंगरे यांना फोन केला आणि बाहेर बोलावले. जिल्हा परिषद आवारातून खासदार पाटील यांनी डोंगरे यांना त्यांनीच बाहेर नेले. त्यामुळे पती-पत्नी सदस्य असलेले डोंगरे दांपत्य अर्ज न भरता सभागहातून बाहेर पडले. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत रयत विकास आघाडी, शिवसेना आणि स्वाभिमानी विकास आघाडी यांच्याशी  बोलणी चालू होती. सोमवारी आमदार मोहनराव कदम यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी पाठिंब्याबाबत चर्चा झाली. पण ती अयशस्वी ठरली. आमदार बाबर यांनी शिवसेनेच्या तीन सदस्यांचा पाठिंबा भाजपला रात्री पावणे अकराच्या सुमारास जाहीर केला. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या शिष्टाईला अखेर यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आमदार बाबर यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजप बहुमतापर्यंत पोहोचला. खासदार राजू शेट्टी समर्थक एक आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाच्या दोन सदस्यांनीही भाजपलाच पाठिंब्याने अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी १० मताच्या फरकाने सत्ता काबीज केली. 
 

‘अस्मिता’वरच्या खेळ्या रंगल्या, पण फसल्या...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे अर्ज भरण्यापूर्वी सत्तेची गणितं जमवण्याचा प्रयत्न झाला. आमदार पतंगराव कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडून सेनेचे आमदार अनिल बाबर व स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते घोरपडे यांची मनधरणी करण्यात आली. परंतु सेना आणि सरकार दोन्हींनी काँग्रेसला ठेंगाच दाखविला. 

संपतरावांचा त्याग ते संग्रामसिंहांचा लाल दिवा
झेडपीचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे वडील संपतराव देशमुख १९९५ मध्ये आमदार होते. त्यांनी मंत्री अन्‌ लाल दिव्याचा हव्यास सोडून मला टेंभू योजनेचे स्वप्न पाहायचे आहे, असे सांगितले. यामुळे युतीच्या जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या. त्यावेळी ज्यांनी युतीला मदत केली त्यातील बहुतांश नेते आता भाजपात आहेत. त्यात आमदार शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश आहे.
 

टेंभूला भरीव निधीच्या आश्‍वासनाने बाबर समाधानी
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी भाजपला सोमवारी रात्री दहा वाजता पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना टेंभू योजनेसाठी भरीव तरतूद आणि नागेवाडी साखर कारखान्याबाबत सरकार सकारात्मक राहिल, असे सांगितल्याचे समजते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला अध्यक्षपदाची दिलेली ऑफरही धुडकावल्याचे 
मानले जाते.

Web Title: zp chairman election result