वर्चस्व राखण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीत होते; पण नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता अचानक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. या निवडणुकीत नगरपालिकांवर वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीत होते; पण नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता अचानक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. या निवडणुकीत नगरपालिकांवर वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आहे.

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये पन्हाळा व पेठ वडगाव वगळता सध्या सात नगरपालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. यातील काही नगरपालिका स्वबळावर आहेत तर काही पालिकांमध्ये आघाडी केली आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये मिळून 199 सदस्य आहेत; त्यापैकी 109 सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. गेल्या पाच वर्षांत मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला या निवडणुकीत चांगलेच झगडावे लागणार आहे. हे ओळखून त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या भोवतीने घोळका करणारी काही माणसं सर्वच पक्षांत असतात. दोन्ही कॉंग्रेसची राज्यातील सत्ता जाताच काही लोकांनी त्यांची साथ सोडून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भोवती हे कार्यकर्ते आता घोळका करताना दिसत आहे. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण जोरात आहे. एका तालुक्‍यातील दोन नेत्यांची एकमेकाबद्दल टोकाची मते असतात. त्यातच कॉंग्रेसवाल्यांची भूमिका सहकारात वेगळी असते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकीत वेगळी असते. तीनही पातळीवर कधीही कॉंग्रेसच्या नेत्यांचे एकमत दिसणार नाही. त्याचा फायदा त्या-त्या वेळी विरोधक उचलतात.

नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे तरी देखील शतकी परंपरा सांगणाऱ्या कॉंग्रेसमध्ये फारशा हालचाली दिसत नाहीत.

भाजपने लहान गटाकडे लक्ष केंद्रित करुन जिल्ह्यात बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळत असून या प्रयोगातून त्यांनी काही सहकारी संस्थांमध्ये प्रवेश केला आहे. या निवडणुकीत तोच प्रयोग भाजप राबविण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील अर्धा डझन आमदार या निवडणुकीत शिवसैनिकांच्या पाठीशी किती प्रामाणिकपणे राहतात यावरच त्यांचे नगरपालिका क्षेत्रातील स्थान ठरणार आहे.

Web Title: zp election in kolhapur