विद्यमान अध्यक्षांसह दिग्गज ‘आउट’

विद्यमान अध्यक्षांसह दिग्गज ‘आउट’

कोल्हापूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटांचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी काढलेल्या सोडतीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील यांच्यासह अनेक दिग्गज पदाधिकारी ‘आउट’ झाले आहेत. सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखणाऱ्या करवीरमधील सर्वच गट आरक्षित झाले आहेत. हातकणंगलेची अवस्था तशीच आहे. रेंदाळ वगळता या तालुक्‍यातील सर्व गट आरक्षित झाले आहेत.  

गटांचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी काढलेल्या सोडतीनंतर निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला. गटांचे आरक्षण निश्‍चित करत असताना यावेळी आरक्षण सोडतीबरोबरच चक्राकार पद्धत वापरण्यात आली. प्रभागांचे आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर अनेकांना थांबावे लागणार आहे, तर काहींनी  आजुबाजूच्या गटांत पाय पसरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या दिग्गजांना बसला फटका 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. पाटील यांच्यासह उपाध्यक्ष शशिकांत खोत, समाजकल्याण समिती सभापती किरण कांबळे, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगुले, माजी सभापती भाग्यश्री गायकवाड, महेश आपटे, धैर्यशील माने यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. माजी अध्यक्ष उमेश आपटे. उदयसिंह देसाई यांचे गट मात्र आरक्षणातून सुटल्याने त्यांना पुन्हा संधी आहे.

करवीरला सर्व अकरा गट आरक्षित 
अकरा गट असणाऱ्या करवीर तालुक्‍यात एकही जागा आरक्षणातून सुटली नाही. अकरापैकी पाच अनुसूचित जातीसाठी, पाच महिलांसाठी आणि एक गट ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह सर्व विद्यमान सदस्यांना फटका बसला आहे.
 

हातकणंगलेला फक्त रेंदाळ खुला 
हातकणंगले तालुकाही मोठा आहे. या तालुक्‍यातही अकरा गट आहेत. त्यांपैकी केवळ एक गट खुला राहिला आहे. बाकी सर्व गटांवर आरक्षण पडले आहे. त्यामुळे पक्षप्रतोद शहाजी पाटील, शिवसेनचे बाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण इंगवले, धैर्यशील माने, समाजकल्याण समितीचे सभापती किरण कांबळे, भाजपचे देवानंद कांबळे यांना फटका बसला आहे. शिरोली गट महिलांसाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या विद्यमान सदस्य शौमिका महाडिक व रेंदाळ खुला झाल्याने डॉ. सुमन मिणचेकर यांना पुन्हा संधी आहे.
 

शिरोळला मादनाईक, अमर पाटील यांना फटका  
 शिरोळ तालुक्‍यात सात गट आहेत. त्यांपैकी पाच गटांवर आरक्षण आहे. त्यामुळे बांधकाम समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य अनिल मादनाईक, सुरेश कांबळे, अमर पाटील यांना फटका बसला आहे. बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील यांचा दत्तवाड गट खुला झाल्याने त्यांना पुन्हा संधी आहे; पण खुल्या गटातून महिलांना संधी दिला जाणार का, हा प्रश्‍न आहे.
 

पन्हाळा तालुक्‍यात उमेदवारांची होणार भाऊगर्दी 
पन्हाळा तालुक्‍यातील सहा गटांपैकी तीन गट आरक्षित झाले आहेत. त्यामुळे भाग्यश्री पाटील, प्रकाश पाटील या विद्यमान सदस्यांना थांबावे लागणार आहे. कळे, कोतोली व सातवे खुले असल्याने या ठिकाणी उमेदवारांची चांगलीच गर्दी होण्याची शक्‍यता आहे.
 

कागलला दोन आरक्षित, तीन खुले 
कागल तालुक्‍यात पाच गट आहेत. त्यांपैकी दोन गट आरक्षित झाले आहेत. तीन गट खुले आहेत. भाजपचे विद्यमान सदस्य परशुराम तावरे यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. गगनबावड्यातील दोन्ही गटांवर गेल्या निवडणुकीत महिलांचे आरक्षण होते. यावेळी मात्र दोन्ही गट खुले झाले आहेत. 
 

राधानगरीत ए. वाय, तायशेटे, चौगुलेंना फटका 
राधानगरी तालुक्‍यातील पाचपैकी तीन गट आरक्षित झाले आहेत. शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य हिंदूराव चौगुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना फटका बसणार आहे.

नगराध्यक्ष आरक्षण

इचलकरंजी - अनुसूचित जाती (एससी) 

पेठवडगाव, मलकापूर, मुरगूड -  नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)

जयसिंगपूर - अनुसूचित जाती महिला (एससी महिला)

कुरुंदवाड व गडहिंग्लज - खुला प्रवर्ग

पन्हाळा, कागल - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी महिला)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com