मंजुरीचा गजर आणि पदाधिकाऱ्यांवर ठोकाही 

मंजुरीचा गजर आणि पदाधिकाऱ्यांवर ठोकाही 

कोल्हापूर - आचारसंहितेच्या भीतीने विषयपत्रिकेवरील कोणत्याही कामाला विरोध न करता जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत चाळीस विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. केवळ केंद्रीय विद्यालयाचा विषय नामंजूर केला. 

दरम्यान, पदाधिकाऱ्यांवरील रोष सभागृहाची मुदत संपत आली तरी कायम असल्याचे आजच्या सभेत दिसून आले. या सभेत अध्यक्ष व सभापती निधी वाटपात पक्षपातीपणी करत असल्याचा आरोप झाला. 

आजच्या सभेत सुजाता पाटील यांनी अध्यक्षानीच उत्तर देण्याची मागणी केल्यामुळे अध्यक्षांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. महिला व बाल कल्याण समिती सभापती यांनीही आज सभागृहात बाजू मांडून टेंडरच्या कामांना मंजुरी मिळवून घेतली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील होत्या. 

आजच्या मूळ विषयपत्रिकेवरील केवळ दोनच प्रश्‍न होते. त्यानंतर कालपर्यंत आयत्यावेळचे सोळा प्रश्‍न आले. त्यानंतर मात्र आयत्यावेळच्या विषयांचा सपाटाच सुरू झाला. सभा संपत आली तरी सभागृहात आयत्यावेळचे विषय येतच होते. अखेर ही संख्या चाळीसवर गेली. 
जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आजची सभा खेळीमेळीत, शांततेत होईल, अशी अपेक्षा होती; पण पदाधिकाऱ्यांच्या कारभाऱ्यावरून सभेत गोंधळ झालाच. 

समाजकल्याण, शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका झाली.समाजकल्याण समितीच्या अभ्यास दौऱ्याचा वादग्रस्त प्रश्‍न धैर्यशील माने यांनी उपस्थित केला. आता अभ्यास दौरा करून त्याचा जिल्हा परिषदेला काय फायदा होणार आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी सुरेश कांबळे, विकास कांबळे, दयानंद कांबळे एकाचवेळी उठून बोलू लागल्याने सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यामुळे प्रथम विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करून प्रश्‍नोत्तरे घेण्याचे ठरले. त्यामुळे विषयपत्रिकेवरील केंद्रीय विद्यालयाचा विषय सोडून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. 

विषयपत्रिकेवरील शिवणयंत्र खरेदीच्या निविदेवर चर्चा सुरू झाली. या विषयावरूनही मशीनची किंमत, त्याचा दर्जा, गुणवत्ता यावरून गोंधळ सुरू झाला. त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील यांना त्याचा खुलासा करावा लागला. 

या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही आधिकारी उपस्थित नव्हते. मेघाराणी जाधव यांनी यासंबंधी प्रश्‍न उपस्थित केला. तेव्हा त्यांना अधिकारी व्ही.सी. ला गेल्याचे सांगण्यात आले. 

जाधव यांनी अधिकारी येईपर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी केली; पण शेवटची सभा आहे, असे म्हणत सदस्यांनी त्यांना शांत केले. 

एस. आर. पाटील यांनी मनरेगा संदर्भात कामे करता येत नाही. असे असतानाही यासाठी निधी का वाढविला जातो? असा प्रश्‍न उपस्थित केला. 
विजया पाटील यांनी समाजकल्याण समितीवर आरोप करत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे समान वाटप न झाल्यास ते रोखले जाईल, असा इशाराच दिला. यावर सभापती किरण कांबळे यांनी धमकी देऊ नका, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हटल्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ झाला. सुरेश कांबळे यांनी रमाई आवास योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी केली. 

शिक्षण विभागावर टीकेची झोड 
शिक्षण विभागावर आज पुन्हा टीकेची झोड उठविण्यात आली. हिंदुराव चौगुले यांनी गेल्या दोन वर्षांपासून रजेवर गेलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक घेण्यासाठी परवानगी दिली नसल्याचा आरोप केला. यावरून माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना धारेवर धरले. एकनाथ पाटील यांनी, समायोजन केलेल्या ठिकाणी सर्व शिक्षक हजर झाले काय? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. यावर शिक्षण संस्थांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे श्रीमती शिंदे यांनी सांगितले. यावर पाटील यांनी सर्व शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे येत्या महिन्यापासून संबंधितांचे पगार रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेत विकास कांबळे, ए. वाय. पाटील आदींनी भाग घेतला. 

नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ई मॉनिटरिंग अंतर्गत शाळांना एलईडी प्रोजेक्‍टर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून बॅंक गॅरंटी घ्यावी, अशी सूचना परशुराम तावरे यांनी केली. 

अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांच्या नावावर रक्‍कम जमा करण्याचे काय झाले? असा सवाल अर्जुन आबिटकर यांनी केला. यावर समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी, लाभार्थ्यांची यादी तयार होताच ही रक्‍कम वर्ग केली जाईल, असे सांगितले. यावरूनही सभागृहात गोंधळ झाला. अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी लाभार्थ्यांच्या नावावर यादी निश्‍चित झाल्यानंतर दोन दिवसांत रक्‍कम जमा करण्याचे आश्‍वासन दिले. 

अध्यक्षांवर आरोप 
देखभाल दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत निधी वाटपात अध्यक्षांनी परस्पर कारभार केला आहे. निधीचे समान वाटप केले नाही, असा आरोप सुजाता पाटील यांनी केला. याबाबतचा खुलासा स्वत: अध्यक्ष विमल पाटील यांनी करावा, अशी मागणी केली. यावर हिंदुराव चौगुले मध्येच उठून बोलू लागले. त्याला एस. आर. पाटील यांनी हरकत घेत तुम्हाला विचारले नाही. तुम्ही बोलू नका, असे सुनावले. यावरून किरकोळ वादावादी झाली. सुजाता पाटील यांनी पुन्हा अध्यक्षांकडे पाहत खुलासा करण्याची मागणी केली; पण अध्यक्ष केवळ हसतच राहिल्या. 

मेघाराणी जाधव यांनी तिसंगी (ता. गगनबावडा) येथील पेयजल कामाच्या योजनेची चौकशीची मागणी केली. विकास कांबळे यांनी शिरोळ येथील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत मीटिंग घेणार होता काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी बैठक घेतल्याचे सांगितले. त्याला राणी जाधव यांनी हरकत घेतली व कधी बैठका घेतल्या, त्याला आम्हाला का बोलावले नाही? असे प्रश्‍न उपस्थित केले. 
आज झालेल्या चर्चेत राजेंद्र परीट, बाजीराव पाटील, उमेश आपटे, शहाजी पाटील, संजिवनी गुरव, भाग्यश्री पाटील, राहुल देसाई, बाबासाहेब माळी आदींनी भाग घेतला. 

वीज नाही आणि ई मॉनिटरिंग 
जिल्हा परिषदेच्या शाळेत ई लर्निंग, ई मॉनटरिंग उपक्रम राबविण्यात येत आहे; पण अनेक शाळांमध्ये विद्युत कनेक्‍शन नाही. काही शाळांमध्ये शेतीपंपासाठी घेतलेल्या कनेक्‍शमधून लाईट घेतली जाते; पण ती दिवसभर चालू नसते. त्यामुळे शाळांमध्ये लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी मेघाराणी जाधव यांनी केली. 

लाभार्थ्यांची तक्रार नाही 
सॅनेटरी नॅपकीन अतिशय सुमार दर्जाच्या पुरवविण्यात येत असल्याची तक्रार संजिवनी गुरव यांनी गेल्या सभेत केली होती. आजच्या सभेतही त्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. यावर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी त्यासंदर्भात लाभार्थ्यांची तक्रार नाही, असे सांगताच संपूर्ण सभागृह संतप्त झाले. सदस्यांनी देखील तुम्हाला लाभार्थ्यांनीच तक्रारी दिली पाहिजे काय? असा सवाल उपस्थित केला. शेवटी डॉ. पाटील यांनी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com