जि. प. कार्यालय प्रवेशात ‘मानापमान’ नाट्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व गटनेते अरुण इंगवले यांच्या कार्यालय प्रवेशाच्या कार्यक्रमात आज मानापमानाचे नाट्य चांगलेच रंगले. ऐन वेळी भारतीय जनता पक्षाने गटनेते म्हणून अरुण इंगवले यांच्या नावाची घोषणा केल्याने पक्षप्रतोद विजय भोजे यांनी कार्यक्रमास अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्‍त केली. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व गटनेते अरुण इंगवले यांच्या कार्यालय प्रवेशाच्या कार्यक्रमात आज मानापमानाचे नाट्य चांगलेच रंगले. ऐन वेळी भारतीय जनता पक्षाने गटनेते म्हणून अरुण इंगवले यांच्या नावाची घोषणा केल्याने पक्षप्रतोद विजय भोजे यांनी कार्यक्रमास अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्‍त केली. 

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. महाडिक, उपाध्यक्ष श्री. पाटील व श्री. इंगवले यांनी आज कार्यालयात समारंभपूर्वक प्रवेश केला. या निमित्ताने कार्यालयाचा परिसर फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. मावळत्‍या अध्यक्षा विमल पाटील यांच्‍याकडून महाडिक यांनी कार्यभार स्वीकारला.
जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच आज अध्यक्ष व उपाध्यक्षांनी समारंभपूर्वक कार्यालयात प्रवेश करण्याचा कार्यक्रम झाला. प्रथम सौ. महाडिक यांनी आपल्या कार्यालयात प्रवेश केला. अध्यक्षांच्या दालनात गेल्या अनेक वर्षांपासून हवालदार म्हणून काम करणारे (पट्टेवाला) प्रकाश आपटे यांच्या हस्ते कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सौ. महाडिक यांनी अध्यक्ष कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात प्रवेश करताच बाहेर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपाध्यक्ष श्री. पाटील यांनी गटनेते अरुण इंगवले यांच्या उपस्थितीत कार्यालयात प्रवेश केला. पक्षप्रतोद व गटनेते यांच्यासाठी एकच केबिन आहे. त्यामध्ये गटनेते म्हणून श्री. इंगवले यांनी प्रवेश केला. पक्षप्रतोद म्हणून यापूर्वीच नियुक्‍ती केलेले विजय भोजे मात्र या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले.

जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत विजय भोजे यांची पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाल्यानंतर कार्यालयीन प्रवेशाचा समारंभ आज निश्‍चित झाला. अध्यक्ष सौ. महाडिक यांनी पक्षप्रतोद पदाबाबत प्रशासनाला पत्रही दिले. दुपारी अध्यक्ष कार्यालयाकडून सर्वांना कार्यालय प्रवेशाचे निमंत्रणही गेले. 

प्रशासनही तयारीला लागले. रात्री अचानक अध्यक्षांच्या स्वीय सहायकांनी पक्षप्रतोद कार्यालयात गटनेते म्हणून अरुण इंगवले यांची निवड झाली आहे, त्यांच्या नावाचीही पाटी तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी पक्षप्रतोदांच्या कार्यालयात आणखी एक टेबल व जुनी खुर्ची लावून त्या ठिकाणी विजय भोजे यांच्या नावाची पाटी लावली. यामुळे नाराज झालेले पक्षप्रतोद श्री. भोजे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्‍त केली.

याप्रसंगी बाबा देसाई, संदीप देसाई, महापालिकेतील विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक सत्यजित कदम, नीलेश देसाई, राजाराम गायकवाड, सुनील कदम, के. एस. चौगुले, राजेंद्र संकपाळ, महेश वासुदेव, अजित नरके व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

Web Title: zp office entry drama