पालिका यशानंतर मूठ ढिली

शांताराम पाटील
बुधवार, 18 जानेवारी 2017

इस्लामपूर - इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी बलाढ्य राष्ट्रवादीला दणका दिला. नेते जयंत पाटील यांची येथील मक्‍तेदारी मोडीत काढत विकास आघाडीने नवा इतिहास घडविला. पण त्यानंतर आता झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची पुनरावृत्तीसाठी विकास आघाडीची घोषणा झाली. मात्र, त्यासाठी एकत्रित हालचाली थंडावल्या असून विरोधकांची मूठ ढिली झाली. विकास आघाडीकडून एकेका मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अस्वस्थता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मैदान मोकळे होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

इस्लामपूर - इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी बलाढ्य राष्ट्रवादीला दणका दिला. नेते जयंत पाटील यांची येथील मक्‍तेदारी मोडीत काढत विकास आघाडीने नवा इतिहास घडविला. पण त्यानंतर आता झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची पुनरावृत्तीसाठी विकास आघाडीची घोषणा झाली. मात्र, त्यासाठी एकत्रित हालचाली थंडावल्या असून विरोधकांची मूठ ढिली झाली. विकास आघाडीकडून एकेका मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अस्वस्थता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मैदान मोकळे होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

वाळवा तालुक्‍यात जयंत पाटील विरोधकांची मांदियाळी आहे. मात्र त्यांचे संघटन करून जयंत पाटलांना शह देण्याचे काम करणारा नेता पुढे येत नाही. सदाभाऊंनी मंत्रिपद मिळाल्यापासून जयंत पाटलांच्यावर थेट तोफ डागत विरोधकांच्यात चैतन्य निर्माण केले आहे. मात्र तालुक्‍यातील महत्त्वकांक्षी विरोधक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सदाभाऊंचे नेतृत्व मानायला तयार नाहीत. नगरपालिका निवडणुकीत शेट्टींनी जोरदार प्रयत्न करून सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार, निशिकांत पाटील आदींनी विकास आघाडी स्थापन केली. आघाडीच्या स्थापनेनंतर महत्त्वकांक्षी नेत्यांच्या नाकदुऱ्या काढत कोणाचाही स्वाभिमान न दुखावता निवडणूक पैलतिराला नेली. निवडणुकीनंतर शेट्टींचा वावर वाळवा तालुक्‍यातून कमी झाला आहे. सदाभाऊंनी विरोधकांची मोट बांधू, अशी घोषणा केली आहे. तरी तशा जोरदार हालचाली कुठेही दिसून येत नाहीत. जयंत पाटील यांनी गावोगाव मेळावे घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करणे सुरू ठेवले आहे. उलटपक्षी विरोधी आघाडीत नेमकं काय करायचं आहे हेच ठरलेले नसल्याने विरोधकांच्यात अस्वस्थता आहे. 

वाळवा तालुक्‍यात येणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील अपवाद वगळता बहुतांशी जिल्हा परिषद गटावर महाडिक गट व आमदार शिवाजीराव नाईक यांचे प्राबल्य आहे. बोरगाव जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांची मजबूत पकड आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी स्वबळाचे तुणतुणे हातात घेतले आहे. रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना व एमआयएम पक्ष यांनी हातात हात घालत एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. हुतात्मा गटाने नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. शिवसेनेचे अभिजित पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. या सर्व घडामोडीत सदाभाऊंना मंत्रिपद मिळाल्यामुळे स्वाभिमानीसुद्धा आम्हाला काही जागा हव्या आहेत यासाठी अडून बसली आहे. त्यामुळे विकास आघाडीत मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक, अशी अवस्था होऊन बसली आहे. 

शेट्टी घेणार मोठ्या भावाची भूमिका ? 
राष्ट्रवादी वगळून सर्वपक्षीय विरोधी आघाडी स्थापन करताना प्रत्येक पक्षाला स्थान द्यावे लागणार हे निश्‍चित आहे. असे असले तरी अनेकांनी आम्ही म्हणतोय तसे होत नसेल तर आमचा विकास आघाडीला रामराम, अशी भूमिका घेतली आहे. या सर्वांना समजावून सांगण्यासाठी राजू शेट्टींना परत एकदा मोठ्या भावाची भूमिका घेत विकास आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न करावे लागतील; अन्यथा राष्ट्रवादीला निवडणुकीचा मार्ग सुकर होईल, अशी चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.

Web Title: zp & panchyat committee election in islampur