बालेकिल्ला राखण्याचे दोन्ही काँग्रेससमोर आव्हान

बालेकिल्ला राखण्याचे दोन्ही काँग्रेससमोर आव्हान

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्‍या राजकीय हालचालींना वेग

कोल्हापूर - सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान होऊ लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान भारतीय जनता पक्षाने काँग्रेससमोर उभे केले आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेकडे मतदारसंघांचे आरक्षण निश्‍चित झाल्यापासून लक्ष लागून राहिले होते. अखेर आज निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि राजकीय हालचाली वेगवान झाल्या. 

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविला. राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आणि चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलू लागली. राज्यात सत्ता आल्यानंतर कोल्हापुरात झालेल्या महापालिका, गोकुळ, नगरपालिका त्याचप्रमाणे साखर कारखान्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद वाढविल्याचे चित्र आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर प्रबळ असणाऱ्या गटाशी किंवा आघाड्यांशी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणातून त्यांनी जिल्ह्यात चार नगरपालिकांमध्ये आपले नगराध्यक्ष निवडून आणले.हेच धोरण भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राबविणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणातही भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसमधील काही नेत्यांना फोडून आपणही काही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. इचलकरंजीच्या सात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. याशिवाय हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, आजरा येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले आहे. त्यामुळे कागल, शिरोळसारख्या तालुक्‍यांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार शोधावे लागणार आहेत. भारतीय जनता पक्षाने दोन महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. अन्य पक्ष मात्र अजून उमेदवारी मागणी अर्ज उपलब्ध करून देण्याच्या टप्प्यातच आहेत. सत्ता गेली तरी काँग्रेसमधील गटबाजी अजून काही गेली नाही. त्यामुळे त्याचाही फटका काँग्रेसला बसणार असल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्याचे आव्हान दोन्ही काँग्रेसपुढे आहे.

सर्वसाधारण गटात लक्षवेधी लढती 
या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्यामुळे सर्वसाधारण गटातील लढती लक्षवेधी असणार आहेत. या गटातून साधारणपणे नेत्यांचे वारसदारच निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघ खुले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com