जिल्ह्यातील 824 जणांचे भवितव्य ठरणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर मतदारराजा लोकशाहीचा उत्सव साजरा करेल. जिल्ह्यातील 19 लाख 66 हजार मतदार जिल्हा परिषदेसाठी 289, तर पंचायत समित्यांसाठी 535 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर मतदारराजा लोकशाहीचा उत्सव साजरा करेल. जिल्ह्यातील 19 लाख 66 हजार मतदार जिल्हा परिषदेसाठी 289, तर पंचायत समित्यांसाठी 535 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

राजकीय अस्तित्व, प्रतिष्ठा टिकविण्यासाठी मातब्बरांसह नव्या दमाच्या भिडूंनीही या निवडणुकीत शड्डू ठोकलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यापासून इच्छुकांसह उमेदवारांनी प्रचाराचा धडका लावला होता. नेतेमंडळी, उमेदवार, कार्यकर्त्यांनी जिल्हाभर प्रचाराचे रान उठविले होते. गुडग्याला बाशिंग, रडारडी, माघार, जिरवा जिरवी, पाडापाडी, शक्‍तिप्रदर्शन, जाहीर सभा, आरोप- प्रत्यारोपांची राळ याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून गेले होते.

रविवारी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर रविवारी रात्रीपासून छुप्या प्रचाराचा जोर वाढला होता. मतांची गोळा बेरीज करण्यापासून आपला मतांचा गठ्ठा शाबूत ठेवण्यासाठी उमेदवारांसह प्रचार यंत्रणांनी प्रयत्न केले. मातब्बरांची प्रतिष्ठा, अस्तित्व, आप्तेष्ठांचे प्रेम पणाला लागले असल्याने प्रचारात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही, अशी पावले उमेदवारांकडून उचलली गेली.

मंगळवारी या निवडणुकीसाठी मतदान होत असून, जिल्ह्यातील दहा लाख 14 हजार 486 पुरुष, नऊ लाख 52 हजार 23 महिला मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. उद्या सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 824 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशिनमध्ये बंद होणार असल्याने उमेदवारांसह नेतेमंडळी, प्रचारकांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली असून, कोणाला यश द्यायचे, हे मतदार ठरवतील.

दरम्यान, निवडणूक, मतदान प्रक्रिया काटेकोरपणे, शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 16 हजार 982 शासकीय कर्मचारी कार्यरत असून, पाच हजार 894 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. दोन हजार 584 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. मतमोजणी मशिन, साहित्य पोचविणे, आणण्यासाठी एसटीसह 642 इतर वाहनांची व्यवस्था केली आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

असे आहेत उमेदवार
तालुका...... जिल्हा परिषद....... पंचायत समिती

सातारा............ 42............. 74
कऱ्हाड........... 57...............108
पाटण ............ 34............. 64
फलटण........ 33................54
खंडाळा........ 20................31
माण............ 24................45
खटाव........ 27................53
कोरेगाव........ 22..............36
वाई............. 13...............34
महाबळेश्‍वर..... 05..............10
जावळी........... 12..............26

तालुकानिहाय मतदार
सातारा- 2,80,329, कऱ्हाड- 3,51,114, पाटण- 2,47,602, फलटण- 2,22,428, खंडाळा- 87,320, माण- 1,46,935, खटाव- 2,13,826, कोरेगाव- 1,74,164, वाई- 1,25,808, महाबळेश्‍वर- 32,473, जावळी- 84,515.

Web Title: zp & panchyat committee election in satara district