जि.प. कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष एम. आर. पाटील व उपाध्यक्ष विजय टिपुगडे यांनी ठरल्याप्रमाणे दीड वर्षाची मुदत संपल्यानंतर आपल्या पदाचे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत दिले. त्यामुळे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या हालचालींना आता वेग येणार आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष एम. आर. पाटील व उपाध्यक्ष विजय टिपुगडे यांनी ठरल्याप्रमाणे दीड वर्षाची मुदत संपल्यानंतर आपल्या पदाचे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत दिले. त्यामुळे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या हालचालींना आता वेग येणार आहे. 

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालीच जिल्हा परिषद सोसायटीची निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत सभासदांनी त्यांच्या कामावर विश्‍वास ठेवून विरोधकांना धूळ चारत संपूर्ण पॅनेलला विजयी केले. निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत एम. आर. पाटील अध्यक्ष झाले आहेत. आता दुसऱ्यांना संधी मिळावी, असा सूर नूतन संचालकांमध्ये होता, पण पाटील यांच्या कारभाराची पद्धत पाहून सुकाणू समितीने पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली. पाटील यांना अध्यक्ष करत असतानाच दीड वर्षाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. त्यानुसार मुदत संपल्यानंतर एम. आर. पाटील व विजय टिपुगडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केले. 

दोन आठवड्यांनंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवड होईल. त्यासाठी इच्छुकांनी आत्तापासून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अध्यक्ष पदासाठी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांच्या हालचाली वेगावणार आहेत. 

या वेळी अध्यक्षपदासाठी महावीर सोळांकुरे, के. आर. किरुळकर, राजू परीट व दिनकर तराळ यांची नावे चर्चेत आहेत. या वेळी अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सुकाणू समितीला इच्छुकांची समजूत काढताना पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्‍त करताना एम. आर. पाटील म्हणाले, ""अध्यक्ष निवडीच्यावेळी ठरल्याप्रमाणे नवीन संचालकांना संधी देण्यासाठी आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत. आपण अध्यक्ष होण्यापूर्वी संस्थेवर जवळपास तेरा कोटींचे कर्ज होते. या कर्जाची पूर्णपणे परतफेड करून संस्थेला दोन कोटींचा नफा मिळवून दिला. सभासदांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारकरीता या ठिकाणी अत्याधुनिक ग्रंथालय सुरू करण्याचे महत्त्वाचे काम आपल्या कारकिर्दीत झाले, याचा मला अभिमान आहे.''

Web Title: ZP President of the Society of staff, Vice President resign