कोल्हापूरमध्ये अंतिम लढतीसाठी आता उमेदवारांचा शड्डू

विकास कांबळे
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - सर्वांचे  लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पात्रता फेरीचा निकाल लागल्यानंतर आता उमेदवारांनी अंतिम सामन्यातील लढतीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम लढतीकडे लागले आहे.

कोल्हापूर - सर्वांचे  लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पात्रता फेरीचा निकाल लागल्यानंतर आता उमेदवारांनी अंतिम सामन्यातील लढतीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम लढतीकडे लागले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती असो किंवा अन्य कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो पूर्वी उमेदवार पाच, पाच वर्षे तयारी करत. त्यामुळे लोकांना उमेदवार माहीत असायचे. पूर्वी केवळ अनुसूचित जातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण असे. वीस वर्षांपासून ओबीसी व महिलांसाठीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण लागू झाल्याने मतदारसंघांबाबतची खात्री कार्यकर्त्यांना राहिली नाही. आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर माहीत नसलेली व्यक्‍ती उमेदवार म्हणून प्रचाराच्या निमित्ताने लोकांसमोर येते आणि विजयीदेखील होते. असे प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घडले आहेत. तसेच निवडणुकीतील दिवसेंदिवस खर्च वाढतच आहे. त्यामुळे आरक्षण निश्‍चित होईपर्यंत इच्छुक उमेदवार शांत राहणे पसंत करतात.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गट किंवा गणांच्या आरक्षणाबाबतची चर्चा गावागावांत सुरू होती. अनेकांनी आपल्याला सोयीचे आरक्षण पडावे म्हणून देव पाण्यात घातले होते, तर काही काहींनी आरक्षणातून मतदारसंघ सुटावा, तो खुला राहावा म्हणून देव पाण्यात घातले होते. या वेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघाच्या रचनेतही बदल होणार आहे. काही गटात नव्याने गावांचा समावेश होणार आहे, तर काही गटातील गावे वगळावी लागणार आहेत. त्याचीही धास्ती उमेदवारांना थोडीफार असते. हक्‍काची गाव दुसऱ्या मतदारसंघात जाऊ नये, यासाठीही काही जणांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. 

सोडत पद्धतीने आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर यात पात्र ठरलेल्या काही उमेदवारांनी गुलाल उधळतच उमेदवारी जाहीर केली. काही कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. नेत्यांनीही तगड्या उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. आरक्षण निश्‍चित झाल्यामुळे आता सर्वच पातळ्यांवरील यंत्रणा गतिमान होऊ लागली आहे. ज्यांचा मतदारसंघ आरक्षित झाला आहे किंवा आरक्षणामुळे ज्यांची अडचण झाली आहे, आशा लोकांना आजूबाजूच्या मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. 

इच्छुकांना पर्याय
आरक्षणामुळे काही उमेदवारांना मात्र थांबण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आरक्षणामुळे आतापर्यंत शांत इच्छुक उमेदवार आता बाहेर पडू लागले आहेत. पूर्वी काँग्रेसशिवाय कार्यकर्त्यांना पर्याय नसायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. भाजप, शिवसेना यांनीदेखील आता जिल्ह्यात ताकद निर्माण केल्याने सत्तारूढ पक्षांना काही ठिकाणी उमेदवार शोधावे लागणार आहेत. या परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची पात्रता फेरीत उत्तीर्ण झालेले कार्यकर्ते अंतिम सामन्यातील लढतीसाठी जोरात तयारीला लागले आहेत.

Web Title: zp reservation in kolhapur

टॅग्स