चार तासांचे रंगणार "माघार नाट्य!' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीत इच्छुकांनी अक्षरश: उड्ड्या घेतल्यात. जिल्हा परिषदेत तब्बल 760, तर पंचायत समित्यांसाठी एक हजार 322 इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत. त्यातील गटात 19, तर गणांत 42 अर्ज बाद ठरले. रणधुमाळीचे अंतिम चित्र सोमवारी (ता. 13) अर्ज माघारीनंतर स्पष्ट होईल. या निवडणुकीत प्रथमच एकाच दिवशी अर्ज मागे घेण्याची मुभा असल्याने अवघ्या चार तासांत "माघार नाट्य' रंगणार आहे. 

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीत इच्छुकांनी अक्षरश: उड्ड्या घेतल्यात. जिल्हा परिषदेत तब्बल 760, तर पंचायत समित्यांसाठी एक हजार 322 इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत. त्यातील गटात 19, तर गणांत 42 अर्ज बाद ठरले. रणधुमाळीचे अंतिम चित्र सोमवारी (ता. 13) अर्ज माघारीनंतर स्पष्ट होईल. या निवडणुकीत प्रथमच एकाच दिवशी अर्ज मागे घेण्याची मुभा असल्याने अवघ्या चार तासांत "माघार नाट्य' रंगणार आहे. 

जिल्हा परिषदेत यंदा सर्व राजकीय पक्षांनी स्वबळाचा नारा आजमावला असल्याने बंडखोरीचे प्रमाण घटलेले दिसते, तरीही जिल्ह्यात प्रबळ असलेल्या राष्ट्रवादी, कॉंग्रेससह आघाड्यांना बंडखोरीचा धोका आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादीला बंडखोरीने ग्रासले आहे. बंडाळी थोपविण्यासाठी नेतेमंडळी कामाला लागली असून, नाराजी काढण्यासाठी इच्छुकांवर आश्‍वासनांची खैरातही केली जात आहे. यापूर्वी अर्ज मागे घेण्यास निवडणूक आयोगाकडून जास्त कालावधी दिला जात होता. यंदाही अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत सात 

दिवसांचा कालावधी असला, तरी प्रत्यक्षात अर्ज मागे घेण्यास एकच दिवस देण्यात आला आहे. 

आजवर अर्ज मागे घेण्यास अनेक दिवस असल्याने दबाव टाकून, नाराजी घालवून अर्ज मागे घेण्यास अवधी मिळत होता. यंदा मात्र "वन डे शो' होणार असल्याने नेत्यांचाही कस लागणार आहे. सहा दिवस रुसवे- फुगवे, नाराजी काढूनही काही इच्छुक ऐन वेळी दगा देण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे असे उमेदवार नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठीही स्वतंत्र व्यूहरचना आखावी लागणार आहे. 

प्रशासनाची धांदल 
चार तासांतील अंतिम टप्प्यात अर्ज मागे घेणाऱ्याची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे कमी वेळात अर्ज माघारी प्रक्रिया हाताळताना प्रशासनाची धांदल उडणार आहे. तीन वाजण्यापूर्वी तहसील कार्यालयात हजर झालेल्या अर्जदारांच्या रांगही लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळप्रसंगी चिठ्ठी देऊन उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी बोलविण्याची परिस्थिती उभी राहण्याची शक्‍यता आहे. 

बंडखोरांना संधीच 
अर्ज मागे घेण्यास अवघे चार तासांच मुदत असल्याने ज्यांना बंडखोरी करायची आहे, त्यांना "गायब' होण्याची संधी आहे, तसेच ऐन वेळी अर्ज मागे घेण्यास राजी होण्यासाठी संधीही इच्छुकांना मिळणार आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उमेदवारांच्या पथ्यावर पडणारा ठरेल. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 13) सकाळी 11 ते दुपारी तीन या चार तासांतच उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. 

- स्वाती चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी, सातारा 

Web Title: zp satara election