esakal | ‘पीएफ’ कार्यालयात वाढतेय ‘एजंटगिरी’
sakal

बोलून बातमी शोधा

pune

‘पीएफ’ कार्यालयात वाढतेय ‘एजंटगिरी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तारीख ३० ऑगस्ट, वेळ. ५.४० मिनिटांची. माझ्या नातेवाइकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला मिळणाऱ्या लाभाची पीएफ रक्कम काढावयाची आहे. पण, कागदपत्राअभावी अडचणी येत आहेत. तसेच माझ्या कंपनीतला जमा झालेला पीएफ देखील मला काढायचा आहे. परंतु, प्रक्रिया माहीत नाही, अशी विचारणा ‘सकाळ’ प्रतिनिधीने एजंटकडे केल्यावर आकुर्डी पीएफ कार्यालयाच्या बाहेर असलेल्या झेरॉक्स दुकानातील एका तरुणाने चटकन पीएफ क्रमांक विचारला आणि कागदपत्रे घेऊन या, असे सांगितले. त्यासाठी हजार रुपये लागतील. लगेच काम करून देतो, असे उत्तर एजंटकडून मिळाले. (Pune News)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाबाहेर आणि कार्यालयातच काहींनी एजंटगिरी सुरू केली आहे. पीएफ नियमितीकरण करणे, बॅलन्सची चौकशी, केवायसी, पीएफ ट्रान्सफर करणे, खाते अपडेट करणे, खात्यातून पैसे काढण्यापासून ते कागदपत्रांपासून अनेक अडचणी पीएफ धारकांना येतात. अशावेळी नागरिकांची माहिती अभावी धांदल उडते. परंतु, काहींनी पीएफमध्येदेखील एजंटगिरी करणे सोडले नाही. महिला व ज्येष्ठांकडून अशा कामांसाठी एक ते दोन हजार रुपयांची मागणी करून पैसे उकळले जात आहेत. झेरॉक्स दुकानदाराने झेरॉक्स दुकानात पीएफची कामे करून मिळतील यासाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक लावला आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

पीएफ कामगारांच्या खात्यात रक्कम भरली नाही म्हणून चाकणमधील एका कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. कोरोना काळात या कंपन्यांच्या तपासण्या झालेल्या नाहीत. परंतु, याचाच गैरफायदा अनेक कंपन्यांनी घेतला. या कंपनीचा एक कर्मचारी पीएफ कार्यालयात दाखल झाला होता. तो म्हणाला, ‘सगळी कामे होतात. केवळ पैसे सरकावणे गरजेचे आहे. कार्यालयातच एक कर्मचारी एजंटची कामे करतो. तो अशी कामे लगेच करून देतो.’

पीएफ ग्राहक एसएमएस, मिस्ड कॉल, वेबसाइट आणि उमंग अॅप्लीकेशनद्वारे पीएफ बॅलन्स चेक करतो येतो. एसएमएसद्वारे ईपीएफ अकाऊंट बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN LAN टाइप करून तो ७७३८२९९८९९ या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे. त्यासोबत ०११२२९०१४०६ वर फक्त मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स तपासता करता येणार आहे. तसेच वेबसाइटवरही तुम्हाला पीएफचा बॅलन्स चेक करता येईल. तसेच या ठिकाणी तुम्हाला पासबुकही डाऊनलोड करता येईल.

हेही वाचा: जबरदस्त! पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजराचा सेन्सेक्स ५८ हजारच्या पुढे

पीएफची कामे करणाऱ्या एजंटला आम्ही हाकलून दिले आहे. काही जण बाहेरून कामे करतात. नागरिकांनी अशा एजंटांकडून कामे करू नयेत. सर्व कामकाजाची प्रक्रिया सोपी आहे. ऑनलाइन आहे. अशावेळी पीएफ कार्यालयाशी संपर्क साधावा. ईपीएफओने प्रत्येक कामाच्या प्रक्रियेसाठी काही व्हिडिओ वेबसाइटवर शेअर केले आहेत. त्याद्वारे तुम्ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ शकता.

- मितेश राजमाने, आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, आकुर्डी

loading image
go to top