मावळातील 'इंद्रायणी'चा सुगंध दरवळणार परदेशात, वाचा सविस्तर बातमी

रामदास वाडेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मावळातील इंद्रायणी तांदळाचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशात दरवळणार आहे.

कामशेत (पुणे) : मावळातील इंद्रायणी तांदळाचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशात दरवळणार आहे. राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आमदार सुनील शेळके यांची भेट  घेऊन त्या अनुषंगाने चर्चा केली. कृषी आयुक्तांनी मावळातील शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. 

मावळ तालुक्यात भात हे मुख्य  पीक आहे. येथील इंद्रायणी तांदळाला मोठी मागणी असते. या वाणाला अधिक दर्जेदार बनवून जागतिक बाजारपेठेत निर्यातीवर धीरज कुमार व शेळके यांच्यात चर्चा झाली. या वाणाची निर्यात करून मावळातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे धीरज कुमार म्हणाले. तांदळाचे  आगार अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात सुमारे १२०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात पिकाची लागवड होते. त्यात  सुवासिक व चविष्ट असणाऱ्या इंद्रायणी वाणाच्या तांदळाला मोठी मागणी आहे. जागतिक बाजारपेठेत त्याची निर्यात वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे  धीरज कुमार यांनी सांगितले. स्थानिक बाजारपेठेत इंद्रायणीची मागणी वाढविण्यासाठी मावळात इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्थानिक शेतकऱ्यांचे गट करून सेंद्रिय शेतीस चालना देणे, शेतमालाला हमीभाव देणे, शेतीपुरक व्यवसायांना तालुक्यात चालना देणे, स्थानिक बाजारपेठ सक्षम करणे, डोंगरात उपलब्ध होणाऱ्या दुर्मीळ जंगली भाज्यांचे जतन करणे, त्यांना व्यावसायिक बाजारपेठेत स्थान देणे, शेतकऱ्यांना व्यावसायिक पिके घेण्यास प्रोत्साहित करणे आही विषयांवर सखोल चर्चा झाली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मावळातील ग्रामीण जीवन शैलीचा अभ्यास करून तालुक्यातील वाढते कृषी पर्यटन केंद्रे विकसित करणे. ग्रामीण जीवनाचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. या दृष्टीने पर्यटन वाढीवर भर देता येईल याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगून शेळके यांनी भाजीपाला निर्यातीसाठी शीतगृह प्रकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Commissioner Dheeraj Kumar and MLA Sunil Shelke discussed about maval indrayani rice