Video : आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांनी शोधलाय आता 'हा' नवा मार्ग

Video : आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांनी शोधलाय आता 'हा' नवा मार्ग

तळेगाव स्टेशन (पुणे) : शिलकीतली गंगाजळी संपली. बँक अथवा फायनान्सकडून कर्जावर घेतलेल्या रिक्षाचे हप्ते थकलेत. त्यांच्या तगाद्याचा ससेमिरा मागे. किराणा घ्यायला, घरभाडे द्यायला पैसे नाहीत. लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या अशा परिस्थितीत घर चालवायचे कसे, या आर्थिक विवंचनेतून पिंपरी-चिंचवड परिसरातील रिक्षाचालकांनी एमआयडीसी परिसरात रोजगाराचा नवा मार्ग शोधला आहे.

हातावर पोट असलेल्या हजारो रिक्षाचालकांना लॉकडाउनमुळे प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ परिसरातील चाकरमान्यांची जीवनवाहीनी समजली जाणारी पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद असल्याने रिक्षाचालकांना प्रवाशांची आशा होती. मात्र, दुचाकींचे शहर म्हणून ख्याती पावलेल्या नागरिकांनी कोरोनापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकींचा पर्याय निवडल्याने रिक्षाचालकांचा भ्रमनिरास झाला आहे. दिवसभर स्टॅन्डवर थांबूनही जेमतेम एखाद-दुसरे भाडे मिळते. दोनपेक्षा अधिक प्रवाशी घेण्यास बंदी असल्याने रिक्षाचालकांना धंदा परवडेना झाला आहे. गेले तीन महिने रिक्षा बंद असल्याने शिलकीतली रक्कमही घरखर्चात गेली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता किराणा भरायला पैसे नाहीत. शिधापत्रिकेवर मिळालेल्या गहू, तांदळावर गुजराण चालू आहे. थकलेले हप्ते भरायला पैसै नाहीत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह लगतच्या तळेगाव, चाकणसारख्या निमशहरी भागातील रिक्षाचालकांची कमीअधिक फरकाने अशीच हलाखीची परिस्थिती झाली आहे. पुढील काही महिने ती आणखीनच बिकट होईल, याची धास्ती सध्या या रिक्षाचालकांना आहे. त्यातुनच या रिक्षाचालकांनी आता आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग शोधून काढला आहे. तो म्हणजे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करण्याचा. चाकण एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात एरव्ही शोधुनही न सापडणाऱ्या प्रवाशी रिक्षांची संख्या अचानकपणे वाढली आहे. विशेष म्हणजे या रिक्षा भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरातील आहेत. ठिकठिकाणी कंपन्यांच्या गेटसमोर अगदी रांगेत रिक्षा थांबलेल्या दिसतात. या गोष्टीचे नवल वाटणे साहजिकच आहे. कारण लॉकडाउनमध्ये धंदा नसल्यामुळे घर चालवायचे कसे, हा प्रश्न भेडसावणारे बरेच रिक्षावाले सध्या चाकण, तळेगाव, चिंचवड, भोसरी एमआयडीसीत रोजंदारीवर कामाला जाऊ लागले आहेत. लॉकडाउनमध्ये गावी गेलेले कामगार अद्यापही न परतल्यामुळे एमआयडीसीत सध्या मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे हेल्परची कामे बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. दिवसभर मिळेल तेवढे एखादे भाडे मारायचे आणि रात्री कंपनीमध्ये हेल्पर म्हणून कामाला जायचे. बरेच जण दिवसाही रिक्षा घेऊन एमआयडीसीत कामाला जातात. आठ तासांची हजेरी चारशे रुपये. लॉकडाउनच्या संकटातून बाहेर येईपर्यंत तरी याच रोजंदारीवरच घर चालवायची खूणगाठ रिक्षाचालकांनी मनाशी बांधली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतीवाडीवर जीवन असलेल्या मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागातील असलेले हे रिक्षाचालक कुटुंबीयांना गावाकडे पाठवू शकत नाहीत. तिकडेच खायची मारामार आता अशा परिस्थितीत गावाकडे जाऊन घरच्यांवर ओझे कशाला टाकायचे म्हणून घर चालवण्यासाठी कामाला शोधले, असे मत रिक्षाचालक श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले.

सरकारने रिक्षाचा वर्षभराचा कर आणि परवाना नुतनीकरण फी माफ करावी. बँकांना रिक्षावरील कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचे आदेश द्यावेत. 
- सुरेश इंगळे, रिक्षाचालक, भोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com