पिंपरीत उसळला ‘भीमसागर’

अनुयायी नतमस्तक; विविध संस्थांकडून उपक्रम
Babasaheb Ambedkar jayanti 2022 mantra learn organize struggle celebrated in pimpri
Babasaheb Ambedkar jayanti 2022 mantra learn organize struggle celebrated in pimprisakal

पिंपरी : ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा विचार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसैनिकांची जमायला सुरुवात झाली होती. त्यांच्या पुतळ्याला आणि स्मारकाला मेणबत्त्या आणि फुलांनी वाहण्यासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गुरुवारी शहर परिसरातून मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात तरुणाईसोबत अबालवृद्धही थिरकले. दुपारी दोननंतर मिरवणूक मार्ग भीमरायांच्या लेकरांनी फुलत होता. जागोजागी तरुण मंडळे आणि भीमसैनिकांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. जयंतीनिमित्त पिंपरी चौकाला जत्रेचे स्वरूप आले होते.

मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे लॉकडाउन परिस्थितीत दोन वर्षे ‌खंड पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या वर्षी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरात दिवसभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. अन्नदान वाटप, पाणी वाटपाचे स्टॉल मांडले होते. शहरात अनेक उपनगरात अनुयांयानी भीमगीते लावली होती. चौकाचौकात पहाडी आवाजातील आणि काळजाचा ठाव घेणारी गाणी ऐकण्यात येत होती. पिंपरी चौक, काळेवाडी, पिंपरीनगर, पिंपरी उड्डाणपूल, खराळवाडी आदी परिसरात मोठमोठे फलक शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आले आहेत. मुख्य रस्ते, चौकांमध्ये निळे ध्वज लावण्यात आले आहेत.

महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि पिंपरी, एच.ए. कॉलनी, व दापोडी येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समवेत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य संयोजक संजय भोसले, ह क्षेत्रिय अधिकारी विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मोकळ्या मैदानाच्या आवारात, रस्त्यावर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती.

समरसता मंचातर्फे पाणपोई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थानी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणपोईची सोय केली होती. समरसता मंचाच्या पाणपोई चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले.

पाणी व थंडपेये वाटप

चौकाचौकांत संस्था संघटनांनी मोफत पाणी पाऊच, शरबत आणि चिवडा वाटपाची दालने लावली होती. तर निळ्या रंगाचे टी शर्ट घातलेले भीमाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते रस्त्यावरील पाण्याच्या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा उचलत होते.

सुक्तपठण

डॉ.बाबासाहेब‌ आंबेडकर वसाहत भीमाई नगर तथागत बौद्ध विहार मध्ये ट्रस्टच्या वतीने गाथेचे सुक्तपठण घेण्यात आले. तसेच लहान मुलांना व सर्व नागरिकांना खाऊ वाटप करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव सुरवसे, ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कांबळे, बालाजी माने उपस्थित होते.

‘विद्युत’ची फिरती टीम

मिरवणूक मार्गावर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम फिरत होती. जेथे कुठे तारा आडव्या येत असतील किंवा तारा तुटून अडथळा होत असेल अशा ठिकाणाहून दूरध्वनी आला तर ही टीम तडक तेथे पोहचत होती.

संस्थांचे उपक्रम

भारतीय बौद्धजन विकास समितीकडून वहीपेन संकलन व वितरण उपक्रम सुरू आहे. आशा बैसाणे यांनी संकलन केले. त्यांचे वितरण ५ जिल्हे व २५ तालुक्‍यात सुरू असल्याची माहिती मिलिंद जाधव यांनी दिली. रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या वतीने ‘एक वही एक पेन’ अभियान राबवण्यात येत आहे, शहरातील शैक्षणिक साहित्य गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com