पिंपरी-चिंचवडमधील 'त्या' श्‍वानप्रेमींवर बंदी घाला; सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया 

आशा साळवी
Tuesday, 13 October 2020

  • अनेक रस्त्यांवर श्‍वानांची असते घाण

पिंपरी : '...तर श्‍वानांना विधीसाठी स्वच्छतागृहातच न्या' या मथळ्याखाली 'सकाळ'मध्ये मंगळवारी (ता. 13) वृत्त प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियावर या विषयाचे पडसाद उमटले. अनेक वर्षांपासून रस्त्यावर श्‍वानांनी केलेली घाण पाहायला मिळत आहे, त्यावर काहीच कारवाई होत नाही. आता कोरोनाच्या काळात थुंकण्यावर जशी बंदी घातली, तशीच बंदी श्‍वानांवर घातली पाहिजे, अशा संतापजनक प्रतिक्रिया 'सकाळ'च्या वाचकांनी सोशल मीडियावर नोंदवल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरांमध्ये कोणतेही प्राणी, पक्षी पाळण्यासाठी महापालिकेकडून परवाना सक्तीचा करावा. किमान चार शेजाऱ्यांचे "ना हरकत' पत्र अनिवार्य करावे. प्रत्येक श्‍वान मालकाकडून श्‍वानांना घराबाहेर नैसर्गिक विधीला नेणार नाही, असे हमीपत्र महापालिकेने लिहून घ्यावे आणि त्याचे उल्लंघन झाल्यास जबर दंड वसूल करावा. दंडवसुली सुलभ होण्यासाठी परवाना देतानाच मोठी रक्कम आगाऊ स्वरूपात अनामत म्हणून घ्यावी. मालकीच्या जागेची अट घालावी. सोसायटी किंवा इमारतींमध्ये राहणाऱ्यांना परवाना देऊ नये, असे केल्यास इतरांचे आरोग्य अबाधित राहील, असे आकुर्डीतील मोहन ओक यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत कायद्याची अंमलबजावणी एकदम कठोर हवी. परदेशात कडक कायदे आहेत. दंड भरपूर आकारला जातो. आणि तो भरला नाही तर सरळ तुरुंगात जावे लागते. त्याप्रमाणे कायदे कडक केले पाहिजेत, असे वल्लभनगरचे नंदकिशोर कुकडे यांनी म्हटले आहे.

चिखलीतील क्रांतिकुमार कडूलकर म्हणाले,"नैसर्गिक विधीसाठी बऱ्याचवेळा भटकी कुत्री मनुष्य वस्तीपासून दूर जातात. पण पाळीव कुत्री सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करतात. त्यांना डॉग हॉस्टेलमध्ये ठेवावे.'' "संबंधित मालकाने बरोबर प्लॅस्टिक पिशवी अन कागद बाळगावा. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सकाळ व सायंकाळी त्यांचे कर्मचारी नेमावेत. परिणामी अशांना पकडून दंड वसुली होऊ शकते, असे वाकड विशालनगरचे गोविंद गायकवाड यांनी सांगितले. 

भोसरीतील संतोष काळे म्हणाले, "प्राणीप्रेमी संस्थांनी भूतदया दाखवावी, पण जबाबदारीने. माणसांना किती त्रास होतो याचा विचार त्यांनी करायला हवा.'' 
पिंपरीगावातील श्रीधर भोसले म्हणाले, "आरोग्य विभागाकडून या श्‍वान मालकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्‍यक आहे.'' 
शाहूनगर अनंत गावडे म्हणाले, "हा खूपच गंभीर प्रश्‍न आहे, आम्ही पण वैतागलो आहोत. आमच्या आजूबाजूला सतत अशी कुत्री फिरवून घाण करणारी लोक आहेत. महापालिकेने खरंच देण्याची गरज आहे.'' 
तळेगावातील दादासाहेब उन्हे म्हणाले,"प्रत्येक श्‍वान मालकाला छोटी प्लास्टिक पिशवी, झाडू, सुपली युक्त एक सफाई किट जवळ बाळगण्याचा आदेश दिला पाहिजे. श्‍वानाने केलेली घाण स्वतः मालकाने साफ करावी. त्यामुळे बऱ्यापैकी फरक पडेल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक प्रभागात श्‍वानांसाठी कचरा कोंडाळा ठिकाणी जागा ठेवावी म्हणजे रस्त्यावर घाण होणार नाही. प्रत्येकजण त्याच ठिकाणी घेऊन जातील. कायमचा प्रश्‍न सुटेल. 
- अनिल भांगडिया, सुखवानी पार्क मासूळकर कॉलनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban on those dog lovers in Pimpri-Chinchwad, Angry reactions on social media