मॅनेजरला कोरोना झाल्यानं बँकच केली बंद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

  • बिजलीनगरमधील प्रकार 

पिंपरी : सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. काहींच्या पगाराची तारीख. त्यामुळे बॅंकेत येणाऱ्यांची संख्या मोठी. मात्र, वेळ होऊनही बॅंक बंदच. प्रवेशद्वारावर सूचना फलक लावलेला. त्यावर 'बॅंक मॅनेजर कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढील तीन दिवस बॅंक बंद राहील,' असा मजकूर. त्यामुळे अनेकांना परत जावे लागले. काहींनी संताप व्यक्त केला, पण, उपयोग नव्हता. कारण, अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना क्वारंटाइन होऊन तपासणी करायची होती. बिजलीनगर परिसरातील एका नामांकित बॅंकेबाबत हा प्रकार घडला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

बॅंक बंद राहणार असल्याने कर्मचारीच प्रवेशद्वारावर थांबून ग्राहकांना परत पाठवत होते. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसात मॅनेजरला भेटलेले ग्राहक कोण, व त्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबतची चर्चा उपस्थितांत रंगली. असे असले तरी, बॅंक बंद ठेवल्याचा फटका परिसरातील बिजलीनगर, गिरिराज सोसायटी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, चिंतामणीनगर, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील ग्राहकांची किमान तीन दिवस गैरसोय होणार आहे. कारण, बिजलीनगर शाखा खातेदारांनी पिंपरी शाखेत जाऊन आर्थिक कामकाज करावे, पैसे काढावेत किंवा भरणा करावा, चेक जमा करावे, असे कर्मचारी सांगत होते. 

बॅंक मॅनेजरला कोरोना संसर्ग झाल्याने कामकाज काही दिवस बंद ठेवावे लागले. आता अनलॉक सुरू असल्याने रुग्णवाढीची शक्‍यताही आहे. त्यामुळे बॅंक असा वा सार्वजनिक ठिकाण नियमांचे पालन करावे. बॅंकांनी जादा सुरक्षारक्षक नेमून चोख तपासणी यंत्रणा उभारावी. प्रवेशद्वारावरच चेक व रोख भरणा करण्याचे चलन मिळावे. आवश्‍यकता असेलच तरच बॅंकेत प्रवेश द्यावा. 
- ऍड. अप्पासाहेब शिंदे, बॅंक ग्राहक, बिजलीनगर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank closed for three days due to manager corona infected at chinchwad