म्हाडाच्या पात्रता शिबिराला लाभार्थ्यांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाच्या पात्रता शिबिराला लाभार्थ्यांची गर्दी

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या उद्देशाने, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)च्या ५ हजार २११ सदनिकांची ऑनलाइन सोडत नुकतीच झाली.

म्हाडाच्या पात्रता शिबिराला लाभार्थ्यांची गर्दी

पिंपरी - सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या उद्देशाने, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)च्या ५ हजार २११ सदनिकांची ऑनलाइन सोडत नुकतीच झाली. सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांचे अर्ज पात्रतेचे शिबिर (कॅम्प) ता. १२ ते १५ सप्‍टेंबरपर्यत शिबीराचे आयोजन केले आहे. आज(ता.१२)पासून सुरू झालेल्या या शिबिराला हजारो लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. अनेक विजेत्यांना देकारपत्र देण्यात आले.

पुण्यातील मंडळाच्या गृह निर्माण भवन आगरकर नगर येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. म्हाडामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड तसेच कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यासाठी ५ हजार २११ सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने सोडत १८ ऑगस्ट रोजी काढली होती. त्यात ज्या लाभार्थ्यांची निवड ही झालेली आहे. २ हजार ८८ सदनिका ह्या सर्वसमावेशक तत्त्वावर स्वीकारण्यात आल्या आहेत. यशस्‍वी लाभार्थ्यांना देकार पत्र देण्यासाठी ४ दिवसांसाठी शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिराची माहिती (कॅम्प)सर्व अर्जदारांना या कार्यालयामार्फत मेलद्वारे कळविण्यात आली होती. या शिबिर (कॅम्प) मध्ये संकेत क्रमांक प्रमाणे तपासणी पथक तयार केले आहेत. या पथकांची यादी शिबिरस्थळी लावलेली असून अर्जदारांनी या यादीप्रमाणे आपापल्या संकेत क्रमांकाच्या तपासणी पथकासमोर आपली रक्कम भरलेली पावती व कागदपत्रे सादर करत होते. सर्व कागदपत्रे पडताळून अर्ज पात्र ठरल्यानंतर २०टक्के स्कीममधील अर्जदारांना देकारपत्र देण्यात येत होते.

म्हाडाच्या योजनेतील अर्जदारांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर १५ सप्‍टेंबरनंतर ई मेलद्वारे देकारपत्र देण्यात येणार आहे. या पात्र अर्जदारांची संख्या पाहता मंडळाने ७ तपासणी पथक नेमले आहेत. ही नेमणूक म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी केली आहे. या शिबिरात टोकन घेऊन सहभागी झालेले लाभार्थी सर्व कागदपत्रे घेऊन सहभागी झाले होते. त्यात कागदपत्रांमधील त्रुटी असल्यास मंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून त्याची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शनही केले गेले.

-पुणे महापालिका - ५७५ सदनिका

-पिंपरी चिंचवड महापालिका - १५१३ सदनिका

-२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (एकूण) - २०८८ सदनिका

‘म्हाडाच्या पुणे मंडळाकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामुळे लॉटरीत घर मिळालेल्या अर्जदारांची कुठलीही गैरसोय न होता एकाच ठिकाणी त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी होत आहे. या म्हाडाच्या योजनेचा सर्वसामान्यांना खूप मोठा फायदा होत आहे. या म्हाडा योजनेअंतर्गत फक्त बांधकाम खर्चामध्ये लाभार्थ्यांना घरे मिळत आहे.त्यामुळे सर्व अर्जदारांनी याचा लाभ घ्यावा.

- विजयसिंह ठाकूर, मिळकत व्यवस्थापक पुणे म्हाडा महामंडळ

Web Title: Beneficiaries Rush To Eligibility Camp Of Mhada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..