
भटक्या विमुक्त जातीत चाळीस टक्के लोकसंख्या ही वडार समाजाची आहे. वडार समाजाची अवस्था अत्यंत खालावलेली आहे.
Prakash Ambedkar : शासनाने वडार समाजाला मोफत शिक्षणाची संधी दिली पाहिजे
भोसरी - भटक्या विमुक्त जातीत चाळीस टक्के लोकसंख्या ही वडार समाजाची आहे. वडार समाजाची अवस्था अत्यंत खालावलेली आहे. शासनाने वडार समाजाला इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी शिक्षणाच्या मोफत संधी मिळवून देण्याची मागणी वंचित बहुजन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पिंपरीत केली.
पिंपरीतील खराळवाडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील मैदानात घेण्यात आलेल्या वडार समाजाच्या महामेळाव्यात बोलत होते.
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, 'समाजातील कारागीरांच्या कला-कुसरीला वाव देण्यासाठी शासनाने अनुदानाच्या स्वरूपात या समाजाला मदत करावी. जेणेकरून या समाजातील कला कुसरीला वाव मिळून भारताच्या आर्थिक उन्नतीलाही हातभार लागेल.'
ब्रिटीश काळापासून समाजावर अन्याय
१८५७ च्या उठावात इतर काही समाज ब्रिटीशांना शरण जात असताना वडार समाज शरण न जाता ब्रिटीशांना सळो की पळे केले. त्यामुळे ब्रिटीशांनी या समाजाला कायद्याने गुन्हेगारी समाज ठरविल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वेगळपण दाखवा
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, 'जोपर्यंत आपले वेगळेपण दाखवत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कोणी बघणार नाही. ज्या दिवशी तुम्ही प्रस्थापितांना सोडून दिले असे दाखवाल, त्या दिवशी तुमची दखल घेतली जाईल. आज या समाजाला निवडणूकीचे तिकीट मागण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आदींकडे जावे लागते. मात्र तुम्ही त्यांची साथ सोडल्यावर ते तुमच्या दारी तिकीट देण्यासाठी येतील.'
तेलगू भाषेचा आग्रह
अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण संपल्यावर काहीजणांनी वडारी समाजाची बोलीभाषा तेलगू भाषेत बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा अॅड. आंबेडकर यांना कार्यकर्त्यांनी काही वाक्ये सांगितली. अॅड. आंबेडकरांनी वाक्ये बोलल्यानंतर जल्लोष करण्यात आला.